राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : कोकणातले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या भाऊ, वहिनी आणि पुतण्या याना बुधवारी २७ डिसेंबर रोजी रायगड लाच लुचपत विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. लाच लुचपत कार्यालयात हजर राहण्यासाठी साळवी कुटुंबीयांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार बुधवार १० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी, भाऊ दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात चौकशीला हजर झाले आहेत. वहिनी अनुराधा दीपक साळवी या आजारपणामुळे गैरहजर राहिल्या होत्या.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते बाबत गेली वर्षभर रायगड लाच लुचपत विभागातर्फे चौकशी सुरू आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी साळवी यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस रायगड लाच लुचपत विभागाने दिली होती. आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारी बाबत चौकशीला बोलवण्यात आले होते.
साळवी कुटुंबाने लाच लुचपत विभागाकडे चौकशीला येण्याची मुदत मागितली होती. त्यानुसार ९ जानेवारी पर्यंत लाच लुचपत विभागाने मुदत दिली होती. १० जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजता आमदार राजन साळवी हे आपला भाऊ आणि पुतण्या यांच्यासह कार्यालयात दाखल झाले. लाच लुचपत विभागाकडून त्याच्या कुटुंबाची चौकशी सुरू झाली आहे.