सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते डहाणूतील शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:25 AM2021-04-04T00:25:09+5:302021-04-04T00:25:18+5:30
कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : डहाणू तालुक्यातील आगर गावातील चंद्रकांत रामचंद्र पाटील हे ४६ वर्षांचे शेतकरी उच्चशिक्षित आहेत. एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना, त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती सुरू केली. त्यांची पत्नी कीर्तिका या ‘ग्रामीण विकास’ या विषयात पदवीधर असल्याने, त्यांच्या कृषी शिक्षणाचा फायदा होतो. या कुटुंबाने १० वर्षांपूर्वी दोन एकर शेतजमीन खरेदी केली.
कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.
शिवाय गांडूळखत, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, कंपोस्ट खत, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी शेतीपूरक व्यवसायांची जोड दिली. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असून त्यांचे शेण आणि शेतातील गवत व कचऱ्यापासून गांडूळखत तयार केले जाते. कृषी विभागामार्फत २०१६ साली सेंद्रिय शेतीच्या गटशेती योजनेेतून २९ शेतकऱ्यांचा ‘संजीवनी सेंद्रिय शेती गट’ स्थापन झाला. या गटाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र सरकारच्या आत्माअंतर्गत संजीवनी सेंद्रिय कृषी उत्पादन गटात खजिनदार या पदावर नियुक्ती झाली.
कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाडमार्फत प्रशिक्षणातून सेंद्रिय शेतीची माहिती त्यांना झाली. त्याद्वारे विविध प्रकारच्या निविष्ठा तयार करण्यास शिकून सेंद्रिय शेती आणि गांडूळखताचे उत्पादन प्रथम सुरू करायचे ठरवले.
कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातून ईसेनिया फेटिडा या जातीची गांडूळ बीजे आणली. त्यांच्याकडे गांडूळखतासाठी जुन्या पद्धतीच्या दोन सिमेंट टाक्या, नवीन पद्धतीने गांडूळखत बनविण्यासाठी चार गांडूळ बॅगा असून इतर गांडूळखत फळझाडांच्या सावलीत तयार केले जाते. शेणखत आणि शेतातील गवत कचरा एकत्र केले जाते. हे सर्व झाडांच्या सावलीत सिमेंटच्या टाकीत टाकून त्यावर पाणी शिंपडून एक महिना ठेवले जाते. त्यामुळे हे मिश्रण अर्धवट कुजते. नंतर हे गांडूळखतासाठी बनवलेल्या टाकीत किंवा बॅगमध्ये टाकून त्यावर दोन ते तीन किलो गांडूळ सोडतात. त्यावर रोज पाणी शिंपडल्याने ओलावा मिळून गांडुळांची संख्या भरपूर वाढून एक ते दीड महिन्यात गांडूळखत तयार होत असल्याचे पाटील सांगतात. खत काढण्यापूर्वी पाणी शिंपडणे थांबवून वरच्या थरातील खत हलक्या हाताने काढले जाते. महिन्याकाठी ७ ते ८ टन या खताचे उत्पादन घेतले जाते. या खताचा उपयोग शेतीसाठी होतोच शिवाय विक्रीतून आर्थिक फायदाही होतो.
अर्धा एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, वांगी आणि वाल ही पिके घेतली जातात. या भाजीपाल्यावर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने कीड रोग नियंत्रण केले जाते. त्यासाठी विविध सापळे, दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. जमिनीतीतून जीवामृत आणि गांडूळ पाणी दिले जाते. हा सर्व भाजीपाला स्थानिक बाजारात विकला जातो. भाजीपाल्यासोबत झेंडू व चवळी लागवडही केली जाते. त्यांनी तीन गीर जातीच्या गायी व २० देशी कोंबड्या पाळल्या आहेत. गोमूत्र जीवामृत बनविण्यासाठी वापरले जाते. अंडी व दूध विक्री केली जाते.
किडींचे अशाप्रकारे केले जाते नियंत्रण
भाजीपाला पिकामध्ये रस शोषक किडी येत असतात. त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ३० याप्रमाणे लावतात. हिरव्या आळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरात ५ ते ६ लावले जातात. तसेच १० ते १२ ओळींनंतर एक ओळ झेंडूची लावली जाते. ही फुले नियमित तोडली जातात. त्यामुळे भाजीपाल्यामध्ये हिरव्या अळीची अंडी आणि अळी अवस्था फुलांसोबत शेतातून बाहेर जाऊन किडीच्या प्रादुर्भाव रोखता येतो.