जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविणार, पनवेलमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 01:33 AM2021-02-14T01:33:58+5:302021-02-14T01:34:18+5:30
strawberry farming in Panvel : महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये पिकवण्याचे धाडस शेतकरी सज्जन पवार व प्रशांत पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीपणे राबविला.
पनवेल : येथील वावंजे गावात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग सज्जन पवार व प्रशांत पवार या काका-पुतण्यांनी राबविला आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी भेट देत या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कृषी विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे यावेळी नवले यांनी सांगितले.
महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये पिकवण्याचे धाडस शेतकरी सज्जन पवार व प्रशांत पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. या शेतीची चर्चा आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेत शेतकरी सज्जन पवार व त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुकही प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले. पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असताना शेतकरी शेतीपासून दुरावला असताना पवार कुटुंबीयांनी शेती टिकवून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे धाडस केले, हे कौतुकास्पद असल्याचे मत नवले यांनी मांडले.
पनवेलमधील कृषी अधिकारी आय.डी. चौधरी यांनीदेखील नावीन्यपूर्ण बाबीअंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड यशोगाथा अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून १५ ते २० हजारांपर्यंत अनुदानासंदर्भात टिप्पणी तयार केली आहे.