प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:50 PM2020-12-31T23:50:17+5:302020-12-31T23:50:24+5:30
रायगड जिल्हा हा औद्याेगिकीकरणामध्ये झपाट्याने पुढे पावले टाकत आहे.
आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावताना दिसत आहे. ताे अधिक गतिमान हाेण्यासाठी आराेग्य, शिक्षण, पर्यटन, नागरी सुविधा यासाठी लागणाऱ्या विभागांसाठी पायाभूत सुविधांवर भर देऊन विविध प्रस्तावित प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हा हा औद्याेगिकीकरणामध्ये झपाट्याने पुढे पावले टाकत आहे. उद्याेगांसाठी शेतीचे क्षेत्र गिळंकृत करून त्या ठिकाणी माेठ्या संख्येने उद्याेगांचे जाळे विणले जात आहे. मात्र त्याच वेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे साेयीस्करपणे डाेळेझाक हाेताना दिसत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर आंदाेलनाची वेळ येत आहे. याच कारणांनी नव्याने पाय राेवणाऱ्या उद्याेगांसाठी ते फारच त्रासदायक ठरत आहे. उद्याेगांच्या माध्यमातून विकास साधायचा असेल तर आधी सरकार आणि प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे साेडवणूक करावी लागेल.
आजही आरसीएफ, गेल, आरपीसीएल (आयपीसीएल), एचपीसीएल यासह अन्य औद्याेगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे घाेंगडे भिजत ठेवले आहे. जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षणासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी आजही मुंबई, पुण्यावरच येथील तरुणांना अवलंबून राहावे लागत आहे. रायगड जिल्हा हा या दाेन्ही महानगरांच्या अगदी जवळ असतानाही ही वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे. सरकार आणि लाेकप्रतिनिधी यांनी याबाबत सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे.
आराेग्याच्या बाबतीमध्येही जिल्हा बराच मागासलेला आहे. उच्च दर्जाचे रुग्णालय, प्रशिक्षित तज्ज्ञ डाॅक्टर, आराेग्यविषयक आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा गेल्या कित्येक वर्षांत झाल्या नाहीत. साध्या आजाराबराेबच गंभीर रुग्णांवर जिल्ह्यात उपचार केले जात नाहीत. त्यासाठी मुंबई आणि पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.