कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठा समजला जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याकरिता लोह-पोलाद बाजार समितीने सुध्दा सकारात्मक भूमिका घेतली आहे. वाहतुकीत जाणारा वेळ त्याचबरोबर व्यापारी व ग्राहकांची सोय व्हावी याकरिता दोन ते तीन ठिकाणी यार्ड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर कळंबोलीवरील भार कमी होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विकसित करण्याबरोबरच शासनाने त्या ठिकाणचा लोखंड- पोलाद बाजार कळंबोली येथे हलवला. येथील ३०२ हेक्टर जमिनीवर १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडे करार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. या बाजारात टाटा स्टील कंपनी, स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया, राष्ट्रीय पार्कनिगम या मोठ्या वखारी आहेत. महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रक आणि कंटेनर स्टील मार्केटमध्ये लोखंडाची ने-आण करण्याकरिता फेऱ्या मारतात. जेएनपीटी बंदरातूनही कळंबोलीतील लोखंड व्यापारी आयात-निर्यात करतात. उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यातून ये -जा करणाऱ्या वाहनांना मालाची चढ -उतार करण्याकरिता आजच्या घडीला कळंबोली गाठावी लागते. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ होते. विशेषत: मुंब्रा, मुंबई-गोवा व जेएनपीटी मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात घडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून कळंबोली स्टील मार्केटच्या विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. (वार्ताहर)
स्टील मार्केटच्या विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव
By admin | Published: July 12, 2015 10:29 PM