‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात संरक्षण कर’, कोळी महिलांची दर्यासागराला नारळ अर्पण करून आळवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:52 AM2019-08-15T02:52:49+5:302019-08-15T02:53:08+5:30

नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील विविध ४२ ठिकाणी कोळी बांधवांनी मिरवणुका काढून दर्यासागराला नारळ अर्पण केला.

 'Protect my lord in the deep sea'; | ‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात संरक्षण कर’, कोळी महिलांची दर्यासागराला नारळ अर्पण करून आळवणी

‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात संरक्षण कर’, कोळी महिलांची दर्यासागराला नारळ अर्पण करून आळवणी

Next

अलिबाग : नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील विविध ४२ ठिकाणी कोळी बांधवांनी मिरवणुका काढून दर्यासागराला नारळ अर्पण केला. त्यामुळे समुद्रकिनारी कोळी बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव आपापल्या होड्या समुद्रात मासेमारीसाठी नेतात. पावसाळ्यात दोन महिने बंद असलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समाजात विशेष महत्त्व असते.

नारळी पौर्णिमेला कोळी समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. उपजीविकेचे साधन असलेल्या समुद्राप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. पावसाळ्यात सोसाट्यांच्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असतो. तसेच या कालावधीत मत्स्यप्रजननाचाही असतो. खवळलेला समुद्र श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेनंतर शांत होतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करून मासेमारीसाठी होड्या समुद्रात नेतात. या परंपरेमुळे तसेच खराब हवामानामुळे पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा मासळी पकडण्यास सुरुवात करतात.

अलिबाग कोळीवाड्यातील खंडोबाच्या मंदिरामधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातून फिरल्यानंतर समुद्रकिनारी समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अलिबागच्या समुद्रकिनारी तीन अधिकारी, ३० कर्मचारी आणि दहा महिला कर्मचारी, बिटमार्शल, दामिनी पथकाचा समावेश होता.

नारळी पौर्णिमेचा कोळीवाड्यात उत्साह
१रेवदंडा : गेले १५ दिवस पावसाने साऱ्यांच्याच नाकी नऊ आणले असतानाही बुधवारी नारळी पौर्णिमेचा सण कोळीबांधवाच्या वाड्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गलबते, होड्या, नौका किनाºयावर सजवण्याची कामे चालू होती. महिला घरात गोडधोड पदार्थ करण्यात मग्न होत्या. साधारणत: कंरजी करण्याची प्रथा किनारपट्टीवरील कोळीवाड्यात आहे.
२येथील परिसरात असलेल्या आग्राव, चुनेकाळीवाडा, थेंरोडामधील विविध कोळी पाडे, साळाव, कोरलईमधील पाड्यात या उत्सवाची लगबग जाणवत होती. काही ठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सांयकाळी काही कोळीवाड्यांतून सजवलेले, पूजन केलेले श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यासाठी मिरवणुका वाजत गाजत निघाल्या होत्या.
३या वेळी पारंपरिक वेश कोळीबांधवांनी केला होता. समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर महिलांनी ‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात जाताना संरक्षण कर आणि भरपूर म्हावरे मिळू दे’ अशी आळवणी दर्यासागराला
केली.

भरडखोल समुद्रकिनारी नारळी पौर्णिमा साजरी
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दर्यासागराला सोन्याचा नारळ अर्पण करताना पारंपरिक वेशभूषांमध्ये कोळी बांधवांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. या उत्सवात भरडखोल येथील कोळी समाज अध्यक्ष रामचंद्र वागे, उपाध्यक्ष भास्कर चौलकर, सोपान पाटील, राजा चौलकर, सरपंच हरिओम चोगले, उपसरपंच किशोर भोईनकर, रामचंद्र पावशे आदीसह कोळी बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मुरुडमध्ये पारंपरिक पद्धतीने सण साजरा
१आगरदांडा : समुद्रकाठी राहणाºया व प्रामुख्याने मासेमारी करणाºया कोळी समाजाचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात.
२पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करण्याकरिता मुरुड कोळीवाड्यातील नवापाडावतीने परंपरेनुसार नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. सजवलेल्या सोन्याच्या नारळाची पूजा करून
वाजत गाजत मिरवणूक काढून
नारळ दर्याराजाला अर्पण करण्यात आला.
३पारंपरिक कोळीगीतांवर ठेका धरून दर्यासागराला नारळ अर्पण करत जल्लोषात साजरा करतात. या मिरवणुकीत सागरकन्या सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले, मनोहर मकू, कोळीबांधव व महिला उपस्थित होत्या.

करंजा येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी
उरण : तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांनीही पारंपरिक सण साजरा केला. त्यात त्यांनी प्रतिकात्मक सोनेरी नारळ तयार केला होता. सजविलेल्या गाडीमध्ये तो नारळ मिरवणुकीने समुद्रकिनारी नेण्यात आला. तिथे पूजा करून होडीने खोल समुद्रात नेऊन अर्पण केला. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक कोळ्याचा पोषाख परिधान केला होता. त्या वेळी वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. तसेच समुद्रकिनारी तयार केलेल्या स्टेजवर विद्यार्थ्यांनी कोळीनृत्यही सादर केले.
काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीतांचा आवाज घुमू लागला आहे. पारंपरिक वाद्यांच्या जागा डॉल्बी सिस्टीमने घेतली आहे; पण उत्साहाची कुठेच कमतरता भासत नाही. खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी करंजा येथील विद्यार्थ्यांनीही श्रीफळ अर्पण के ले. नारळी पौर्णिमेच्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नांदगावमध्ये नारळफोडीत रमाकांत खोत विजयी
मुरुड : मुरुड तालुक्यातील नांदगावच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित नारळफोडी सामन्यात नांदगावच्याच रमाकांत खोत यांनी अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील भावार्थ सारंग याचा केवळ एक नारळ शिल्लक ठेवत पराभव केला व ही स्पर्धा जिंकली.
यशवंतनगर पंचक्रोशीतील नांदगावच्या सिद्धिविनायक मंडळाच्या या प्रसिद्ध स्पर्धेचे २६ वे वर्ष असून, ती दरवर्षी श्री सिद्धिविनायक मंदिराच्या भव्य पटांगणात खेळवली जाते. या वेळी स्पर्धेत अलिबाग मुरुड तालुक्यातील ३२ स्पर्धकांनी प्रत्येकी दहा अस्सल खेळी नारळ घेऊन आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत ३२० पैकी ३१९ नारळ फोडण्यात आले. रमाकांत खोत चार नारळ, तर भावार्थ सारंग दोन नारळ शिल्लक ठेवून अंतिम फेरीत दाखल झाले होते. खोत यांचा विजय सहज वाटत असतानाच सारंग यांचा मारेकरी प्रमोद राऊत यांनी खोत यांचे तीन नारळ फोडीत सामना बरोबरीत आणला होता; परंतु खोत यांचा मारेकरी विराज पाटील यांनी अखेरचा दणका देत विजयश्री खेचून आणली.
सारंग दुसºया क्रमांकावर विजयी झाले, नांदगावच्या आराध्य मळेकर यांना तिसरा क्रमांक मिळाला, तर मुरुडच्या बाबा पालशेतकर हे चौथ्या क्रमांकाचे विजेते ठरले. स्पर्धेतील प्रमोद राऊत उत्कृष्ट मारेकरी ठरला, त्यास आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून विष्णू नागावकर, उमाकांत चोरघे, जयंता पुलेकर, मनोहर मोकल आदीनी काम पाहिले.

Web Title:  'Protect my lord in the deep sea';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड