पनवेल - कोंकण,पश्चिम महाराष्ट्रासह स्थानिक पातळीवर रायगड ठाणे याठिकाणच्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या पनवेल बस आगाराचे काम मागील 14 वर्षांपासून बंद आहे. जुने असलेले डेपो जमीनदोस्त करून पाच वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप या डेपोच्या रखडलेल्या कामाबाबत शासकीय पातळीवर हालचाली होत नसल्याने पनवेल प्रवासी संघाने या विरोधात दि.3 रोजी धरणे आंदोलन छेदत एसटी महामंडळ व सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
यावेळी प्रवासी संघासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकवटले होते. प्रथमच एसटी महामंडळाविरोधात छेडलेल्या या आंदोलनात विरोधकांची एकजुट दिसून आली. काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने हे आंदोलन छेडण्यात आले होते.यावेळी आमदार बाळाराम पाटील,बबन पाटील,सुदाम पाटील, जे एम म्हात्रे,शिरीष घरत,कांतीलाल कडू,लीना गरड ,जी आर पाटील, पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ भक्तीकुमार दवे, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट, निलेश जोशी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी धरणे आंदोलनाला उपस्थित राहिलेल्या आमदार बाळाराम पाटील यांनी देखील एसटी महामंडळ प्रशासनावर टीका केली.पनवेल एसटी डेपोशी सर्वांशी वेगळे नाते आहे.
सर्वसामान्य प्रवासी याठिकाणाहून प्रवास करीत असतो. धनाढ्यांना हे कळणार नाही. पनवेलच्या वेशीवर विमानतळाचे काम सुरु आहे. मात्र सर्वसामान्य विमानात प्रवास करणार नाही त्याच्यासाठी एसटी हेच प्रवासाचे मुख्य साधन असल्याने शासनाने याचा विचार करावा असे अवाहन बाळाराम पाटील यांनी यावेळी केले. पनवेल आगाराच्या पुर्नविकासाचा प्रश्न मार्गी लावण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले असल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली. पुर्नविकासाचे काम तातडीने सुरू करावी यासाठी पनवेलमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक वर्षे कार्य करणाऱ्या पनवेल प्रवासी संघाने हे आंदोलन छेडले. प्रवासी संघाने नुकतीच महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या वरिष्ठांशी भेट घेवून तातडीने काम सुरू केली होती. प्रशासकीय पातळीवर अनास्थेमुळे हे डेपोचे काम रखडले आहे.
प्रवासी बांधवांच्या संयमाचा अंत झालेला आहे.14 वर्षे अनेक समस्या झेलत असंख्य प्रवासी प्रवास करीत आहेत. आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या हाकेनंतर या आगाराच्या रखडलेल्या कामाबाबत बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे.आमचा हा लढा सुरूच राहणार आहे.आमचे मनोबल वाढविणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
-अभिजीत पाटील (कार्याध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ )
बस डेपोत चारचाकी गाड्यांची गर्दी
बस आगार असल्याने ऐरवी बस आगारात एसटीची येजा असते.या धरणे आंदोलनासाठी नागरिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी आगारात केली होती.यावेळी आगारात मोठ्या प्रमाणात चार चाकी,कार यांची मोठी गर्दी झाली होती.एसटी आगार व आजूबाजूच्या परिसरात आज प्रथमच हे आगार आंदोलनकांच्या चारचाकी कारणे गजबजल्याचे पाहावयास मिळाले.