काजूची बी काजुला...धनगर समाज बाजूला; आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा
By राजेश भोस्तेकर | Published: October 9, 2023 03:10 PM2023-10-09T15:10:00+5:302023-10-09T15:11:56+5:30
राज्यात सध्या मराठा, कुणबी, मुस्लिम, धनगर आरक्षणासाठी प्रत्येक समाजाचे आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. धनगर समाजही आरक्षण मिळविण्यासाठी धडपडत आहे.
अलिबाग : काजूची बी काजुला, धनगर समाज बाजूला, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एस टी मधून धनगरांना आरक्षण नको अशा घोषणांनी सोमवारी ९ ऑक्टोंबर रोजी अलिबाग शहरातील रस्त्यावर आदिवासी समाजाचा आवाज घुमला होता. धनगर समाज हा एस टी मधून आरक्षण मागत असल्याने या मुख्य मागणीसह इतर प्रमुख मागण्यासाठी आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरला होता. चार ते पाच हजार आदिवासी बांधव यांनी आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
राज्यात सध्या मराठा, कुणबी, मुस्लिम, धनगर आरक्षणासाठी प्रत्येक समाजाचे आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. धनगर समाजही आरक्षण मिळविण्यासाठी धडपडत आहे. धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत नुकताच समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. आदिवासी हा एस टी प्रवर्गात असल्याने त्याच्या आरक्षणाला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका अशी समस्त आदिवासी समाजाची मागणी आहे.
आदिवासी अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील हजारो समाज बांधव आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते. सोमवारी ९ ऑक्टोंबर रोजी शेतकरी भवन येथून आदिवासीच्या न्याय हक्कासाठी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणा देत हजारो आदिवासी महिला, पुरुष, तरुण या आक्रोश मोर्च्यात सहभागी झाले होते. आपले पारंपरिक नृत्यही यावेळी सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथील हिरकोट तलाव येथे मोर्चाला अडविण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.
आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट करू नये, सरकारी नोकरीत काढलेले खाजगीकरण आदेश रद्द करा, राज्यातील ६२ हजार शाळांचे खाजगीकरण बाबत काढलेला आदेश रद्द करा, दळी जमिनीचे स्वतंत्र सातबारे करा, रायगडात पेसा कायदा लागू करून त्याची त्वरित अंमल बजावणी करा या प्रमुख मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षण धक्का पोहचविले गेले तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही आदिवासी समाजाकडून देण्यात आला आहे. मालू निरगुडे, भगवान नाईक, दिलीप डाके यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.