शिवडी - न्हावा शेवा लिंकरोडबाधीत ग्रामस्थांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी उद्घाटनाच्या दिवशी निषेध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 04:21 PM2024-01-06T16:21:55+5:302024-01-06T16:32:53+5:30
देशातील सर्वात मोठ्या २२ किमी लांबीचा आणि २१२०० रुपये खर्चून उभारलेल्या शिवडी - न्हावा शेवा लिंक रोडचे किमी पुर्ण झाले आहे.
उरण (मधुकर ठाकूर) : शिवडी - न्हावा शेवा लिंकबाधीत चिर्ले ग्रामपंचायतींच्या हद्दीत नागरिकांच्या हिताची सुमारे २० कोटी खर्चाची विविध विकास कामे करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे. प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदलाही अद्याप अदा करण्यात आलेला नाही. मोबादला आणि विकासकामे करण्याची आश्वासने तोंडी नकोत तर लेखी स्वरूपात हमी देण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच एमएमआरडीए आणि राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा चिर्ले ग्रामपंचायतीने दिला आहे.
देशातील सर्वात मोठ्या २२ किमी लांबीचा आणि २१२०० रुपये खर्चून उभारलेल्या शिवडी - न्हावा शेवा लिंक रोडचे किमी पुर्ण झाले आहे. यामुळे मुंबईहून २० मिनिटांत नवी मुंबईला पोहचता येणार आहे. शिवडी - न्हावा शेवा लिंक रोड उभारण्यासाठी शेकडो शेतकरी, मच्छीमार बाधीत झाले आहेत.सागरी सेतूचे काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक मच्छीमार, शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची तारीख ठरली तरीही न्हावा,न्हावाखाडी,गव्हाण,जासई, घारापुरी आदी गावातील शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला तर मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नसल्याने सर्वच संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.
उरण तालुक्यातील चिर्ले गावाच्या हद्दीत शिवडी - न्हावा शेवा लिंक रोड संपणार आहे. या लिंक रोडसाठी चिर्ले गावातील शेतकऱ्यांच्याही जमीनी संपादित केलेल्या आहेत. असे प्रकल्पबाधित शेतकरीही मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.या सागरी सेतूमुळे बाधीत चिर्ले गावातील ग्रामस्थांच्या हिताची विकासकामे करण्याची एमएमआरडीएने तोंडी आश्वासने दिली आहेत.यामध्ये चिर्ले, गावठाण, जांभूळ पाडा गावा दरम्यान रस्त्याचे कॉक्रीटिकरण, तलावांचे सुशोभीकरण, अंतर्गत, रस्ते, नाले, गटारे आदी सुमारे २० कोटी खर्चाच्या कामांचा समावेश असल्याची माहिती चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील यांनी दिली. मात्र विकासाच्या कामांबाबत तोंडी आश्वासने नकोत तर लेखी मुदतीचा समावेश असलेले हमीपत्र देण्यात यावे आणि बाधीत शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला अदा करण्यात यावा या मागणीसाठी निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शिवडी - न्हावा शेवा लिंक रोड आता उद्घाटनानंतर अटल सेतू नावाने ओळखला जाणार आहे.या अटल सेतूचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशीच चिर्ले गावातील सेतुच्या शेवटच्या टोकाला एमएमआरडीए आणि राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा चिर्ले ग्रामपंचायतीने दिला असल्याची माहिती सरपंच सुधाकर पाटील यांनी दिली.