अतिप्रसंगामुळे रोह्यात आंदोलन, पोलिसांविरोधात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 05:30 AM2020-03-07T05:30:28+5:302020-03-07T05:30:31+5:30
शुक्रवारी रोहेकरांनी पोलीस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केल्याने आठवड्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा : रोहा-अष्टमी येथील एका १० वर्षीय गतिमंद मुलीवर ५५ प्रौढ वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत जाऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने रोहा-अष्टमीत प्रक्षोभ निर्माण झाला. शुक्रवारी रोहेकरांनी पोलीस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केल्याने आठवड्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण येथून पोटापाण्यासाठी अष्टमी गावात हे कुटुंब आले. २८ फेब्रुवारीला निर्जन भागात या मुलीला बोलावून गावातील एका प्रौढ व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची घटना घडली. हे लक्षात येताच आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र संबंधित पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. मुलीच्या आईकडून हवे तसे पत्र लिहून घेतले गेले. तिची वैद्यकीय तपासणीही खासगी दवाखान्यात केली. मुलीला खूप वेदना होत असल्याचे आई सांगत असताना पोलिसांनी दुर्लक्ष केले. मुलीच्या कुटुंबीयांनी गाव सोडून जाण्यासाठी त्यांना धमकावले गेले.
>या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांच्या कसुरीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.
- नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक
>मुलगी गतिमंद असल्याने फायदा उठविण्यात आला. खासगी रुग्णालयातील महिला प्रसूती तज्ज्ञांनीही तपासणी अहवाल पोलिसांना वेळेत दिला नाही. अखेर या प्रकरणाला आठवड्यानंतर शुक्रवारी वाचा फुटली. रोहा पोलीस ठाण्यात सबंध अष्टमी-रोहेकर ग्रामस्थ संतप्त झाले. शहरातील सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, तरुणांनी शुक्रवारी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांवर दबाव वाढला. खाजगी डॉक्टरांनी उशिरा दिलेल्या रिपोर्टमध्येही धक्कादायक उल्लेख आले. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनल कदम यांच्याकडे दिली. रोहा पोलिसांत आरोपीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.