रेल्वेस्थानकात सुविधांची वानवा
By admin | Published: October 19, 2015 01:19 AM2015-10-19T01:19:33+5:302015-10-19T01:19:33+5:30
महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत
दासगांव : महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत या रेल्वे स्थानकात उभे राहावे लागत आहे, तसेच येथे बसण्याची कोणती सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छालय नाही, यामुळे या ठिकणाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गैरसोर्इंकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
महाड तालुक्यातील वामणे - सापे हे रेल्वे स्थानक खाडीपट्टी विभागातील म्हत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून गोठे, रावढल, तुडील, खुटील, नरवण, वामणे, सापे, नडगाव, म्हाप्रल, मंडणगड, आंबेत, या अनेक गावातून नागरिक कोकण रेल्वेचा प्रवास करतात. या सर्व गावांना हेच जवळचे स्थानक आहे. या स्थानकावरून दरदिवशी या गावातील शेकडो नागरिक रेल्वेने ये - जा करत आहेत. कोकण रेल्वेने ज्या वेळी कोकणात सुरुवात केली त्यावेळी वीर स्थानक व करंजाडी या मधल्या टप्प्यात रेल्वेचे स्थानकच नव्हते. या खाडी पट्यातील नागरिकांना रेल्वे मार्गाने प्रवास करावयाचा असेल तर विर स्थानकात किंवा करजाडी स्थानकात जावे लागत असे. याचा विचार करत या विभागातील ३० गावांची मनसुर इब्राहीम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खाडीपट्टा एकता रेल्वे संघर्ष समिती तयार करण्यात आली. व या खाडी पट्टा विभागात रेल्वेचे स्थानक व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले. नागरिकांचा विचार करत १२ वर्षापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने वामणे सापे स्थानक तयार केले. या ठिकाणी कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना थांबा देऊन या विभागातील रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर केली.
कोकण रेल्वेने या ठिकाणी स्थानक दिले. थांबा दिला मात्र निवारा शेडची काही सोय नाही. प्रवाशांना बसण्याचे आसन नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वॉचमॅन नाही यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आहे. तसेच तिकीट घरदेखील नाही या ठिकाणी खाजगी व्यक्ती कमिशनवर प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून हे काम करत आहे.
या अगोदर या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विर किंवा करंजाडी स्थानकता तिकीटसाठी जावे लागत होते. सध्याच्या स्थितीत या वामणे - सापे स्थानकावर खाडीपट्टी विभागातील दरदिवशी शेकडो प्रवासी रेल्वेने ये - जा करीत आहेत. मात्र या ठिकाणी या स्थानकात होणाऱ्या गैरसोई बद्दल रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने वामणे - सापे या स्थानकात होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)