रायगडावर पर्यटकांना सुविधा मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:58 AM2018-05-20T02:58:45+5:302018-05-20T02:58:45+5:30
किल्ल्याच्या पायऱ्यांचे काम सुरू
महाड : किल्ले रायगडवर पर्यटकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी शनिवारी दिली. तर रायगड किल्ल्याचा इतिहास जगाच्या नकाशावर पोहोचावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नात असल्याचे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के. जे. अल्फोन्स यांनी किल्ले रायगडला भेट देऊन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची शनिवारी पाहणी केली आणि या कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती, प्राधिकरणाचे सदस्य पांडूरंग बलकवडे, सुधीर थोरात, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बिपीनचंद्र नेगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील कार्यकारी अभियंता सातपुते उपस्थित होते.
किल्ले रायगडवर आगमन झाल्यानंतर अल्फोन्स यांनी रोप वे ते कुशावर्त तलाव मार्गे होळीच्या माळापर्यंत सुरू असलेल्या पथमार्गाची पाहणी आणि जुन्या वाड्यांच्या उत्खननाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयामध्ये उत्खननामध्ये सापडलेल्या शिवकालीन वस्तू आणि ऐवजाचीही पाहणी केली. त्यानंतर जगदिश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले. तेथून परत आल्यानंतर राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथेच पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गडावर सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.
किल्ल्याच्या पायऱ्यांचे काम सुरू
प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळेस किल्ले रायगडवरील फरसबांधणी, उत्खनन, पथमार्ग आणि पायºयांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती दिली.
उत्खननामध्ये सापडलेल्या काही वस्तू औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू एकत्र करून ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी त्या शिवभक्तांना पाहण्यासाठी गडावर आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार किंवा तिथीनुसार साजरा करणे, हा प्रत्येकाचा अधिकार असून तारीख-तिथीच्या वादात न पडता, सर्व विचारांच्या मंडळींचा रायगड प्राधिकरणात समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.