पेण : कणे गावाला पुराचा जबरदस्त फटका बसला होता. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले होते, अशाही परिस्थितीत गावाने धिराने संकटाचा सामना केला. या उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत पुराचे पाणी ओसरल्यानंतर बुधवारी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणे गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधून सहानुभूती दर्शविली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, याची हमी देत ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कणे खाडी खारभूमी बंधारा व खारभूमीचे इतर बंधारे जे पूरपरिस्थितीमुळे फुटलेले आहेत. यासाठी खारभूमी विभागाकडून या बंधाºयाच्या मजबुतीकरणासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा मदतनिधीचा प्रस्ताव एशियन बँकेकडून उपलब्ध करण्याच्या हालचाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सुरू आहेत. यासाठी खारभूमी विभागाचा या बाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. भाजप सरकार पूरग्रस्तांच्या ठाम पाठीशी आहे, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.पेण तालुक्यात वाशी खारेपाटात बुधवारी दुपारी १२ वाजता रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणे ग्रामस्थांना प्रथम भेट दिली. व बाधित झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी छोटेखाणी झालेल्या सभेत त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवि पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील तसेच शासकीय अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. या वेळी ग्रामस्थांनी ज्या मागण्यांचे निवेदन दिले ते पालकमंत्र्यांनी स्वीकारत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पालकमंत्री बोर्झे, वढाव, शिर्की- मसद, अंतोरे येथील पूरपरिस्थितीशी बाधित झालेल्या गावांना भेटी देण्यासाठी निघून गेले. यानंतर पुराने बाधित झालेल्या वाशी व वडखळ विभागातील सर्व गावांना धावत्या भेटी दिल्या.
बंधाऱ्यांसाठी तरतूद होणार, पालकमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:58 AM