महाड : कोणत्याही पद्धतीने भारतात कार्यरत असलेल्या ई - फार्मसी या बेकायदा असून सध्याचे कायदे ई - फार्मसी चालविण्यासाठी परवानगी देत नाहीत, असे सांगून ई - फार्मसीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे मत अखिल भारतीय औषध विक्रेते संघाचे अध्यक्ष आ. जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केले.महाड येथील मोटेल विसावा येथे मुंबई झोनची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. शिंदे बोलत होते. देशातील औषध विक्रेत्यांनी मागील अनेक दशकांपासून ग्रामीण लोक संख्या आणि दुर्गम भागांनाही सेवा दिली असल्याचे सांगून इतर कोणत्याही सर्वसामान्य वस्तूंशी औषधांची तुलना करता येत नाही. औषध विक्रीमध्ये तीन महत्त्वाचे घटक अत्यावश्यक म्हणून कार्य करतात, असे प्रतिपादन आ. शिंदे यांनी केले. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता आरोग्य ही सर्वसामान्य नागरिकांची मूलभूत गरज बनली आहे. डॉक्टरांनी रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांना पर्यायी औषध देण्याचा अधिकार कायद्याने फार्मसिस्टला दिलेला नाही. हा अधिकार मिळवण्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे सांगून मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसोपचार आणि मूत्रपिंड अशा विकारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्या उपचारासाठी खर्च मोठा असल्याने पर्यायी औषध देण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. या सभेला मुंबई झोनचे अध्यक्ष हुकू मराज मेहता, सचिव प्रसाद दानवे, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुष्टे, रायगड जिल्हाध्यक्ष किरीट विठलानी, उपाध्यक्ष व महाड पोलादपूर तालुक्याचे ओबी मोहनकाका शेठ, तालुकाध्यक्ष मनोज शेठ, प्रसाद दाभाडकर, दिलीप मेहता आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
ई - फार्मसीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका
By admin | Published: July 08, 2015 10:30 PM