श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:48 PM2019-10-25T23:48:26+5:302019-10-25T23:48:36+5:30

महाआघाडीचा झाला विजय; सुनील तटकरेंसाठी होती प्रतिष्ठेची लढाई

Public opinion on development in Srivardhan | श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल

श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल

Next

- संतोष सापते

श्रीवर्धन : प्रत्येक निवडणुकीत सत्तासंघर्ष जनता अनुभवत असते. प्रचाराचा उडणारा धुराळा विविध बाबी व मतमतांतरांची निर्मिती करतो. वातावरण निर्मितीद्वारे राजकीय पक्ष आपली भूमिका जनतेसमोर मांडतात. यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीने जनतेचा कौल विकासाला असल्याचा प्रत्यय आला आहे. श्रीवर्धन मतदारसंघात महाराष्ट्रात सत्तास्थानी हिस्सेदार असलेल्या शिवसेनेची टक्कर राष्ट्रवादी काँग्रेसशी होती.

देशात मोदीलाटेची त्सुनामी असताना आपली नौका अगदी सहजपणे संसद भवनाच्या प्रांगणात घेऊन जाणारे खासदार सुनील तटकरे रायगड नव्हे तर कोकणच्या राजकारणातील मोठे प्रस्थ मानले जाते. अदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या असल्याने विधानसभा निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील तरुण नेतृत्व व सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय अशी ओळख अदिती यांनी रायगडच्या राजकारणात निर्माण केली आहे. मृदू भाषा, कार्यकर्त्यांशी जवळीक, मतदारांशी थेट संवाद व वडिलांचा वैचारिक कृतिशीलतेचा वारसा अदिती तटकरे यांच्या विजयात महत्त्वाचा ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ पासून मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांना जनतेसमोर ठेवण्यात पक्ष कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. शिवसेनेने विनोद घोसाळकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात पुनश्च एकदा कार्यकर्ता संघटित केला होता; मात्र त्याला दिशादर्शक मार्गदर्शकाची उणीव भासली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सर्वत्र प्रचारात उतरले; परंतु नियोजन व राजकीय गणिते चुकली.

अपक्ष उमेदवारांना बळ पुरवण्याचे प्रयत्न शिवसेनेने केले, किंबहुना अप्रत्यक्ष बळ पुरवले. मात्र, अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेचा भ्रमनिरास केल्याचे निवडणूक निकालात दिसले आहे. काँग्रेस पक्षाच्या बंडखोरांनी उणेपुरे अडीच हजार मतांचासुद्धा पल्ला गाठला नाही. त्याची परिणती शिवसेनेचे मताच्या आकड्यांचे गणित चुकले ते पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत चुकतच गेले.

मूलभूत प्रश्नांच्या मुद्द्यांना प्राधान्य

या वर्षीच्या लोकसभा व विधानसभेने सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील वर्चस्वाची चुणूक सर्वांना दाखवली आहे. या वर्षीच्या विधानसभेत सर्वात प्रभावी मुद्दा सुनील तटकरे यांचे राजकीय नेतृत्व हा आहे. कारण या विधानसभेला त्यांना सर्व बाजूने घेरण्यात विरोधक यशस्वी झाले होते. मात्र, आपल्या वेगळ्या शैलीने तटकरे यांनी सर्वांना धोबीपछाड दिली आहे.

विकास या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांकडे मते मागितली. आपण गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचे सेवापुस्तक जनतेच्या समोर ठेवले. तर दुसरीकडे शिवसेना आपण विकासकामे करू, असे सांगत जनतेची मते मागत होती. पर्यटन व रोजगार हे विषय सर्व राजकीय पक्षांनी आपल्या अजेंड्यावर ठेवले होते. त्याचसोबत वैद्यकीय सेवा, जनतेच्या मूलभूत गरजा या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले.

नगरपालिका व पंचायत समिती

श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर श्रीवर्धन पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, विधानसभा निवडणूक ही नगरपालिका व पंचायत समिती यांच्या निवडणुकीपेक्षा भिन्न आहे, त्याचा प्रभाव विधानसभेवर क्विचित पडला, असे निदर्शनास आले आहे.

युती व आघाडी यांच्यात पडद्यामागे गडबड झाल्याची चर्चा आहे. आघाडीतील बंडखोर उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते, तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी युती धर्माचे पालन केले नाही.या कारणास्तव वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याचे समजते. मतदारसंघात अनेक दिग्गजांनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, त्याचा प्रभाव मतदारांवर झालेला दिसत नाही. जनतेने आपल्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणाºया पक्षाला मत दिल्याचे दिसून आले आहे.

संघटनात्मक कामगिरी

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची रचना अतिशय संघटनात्मकरीत्या केली होती, त्यामुळे आजही शाखाप्रमुख ते आमदार कामाची विभागणी निदर्शनास येते. या निवडणुकीत मुंबईस्थित विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची स्थानिक पातळीवर काम करणाºया कार्यकर्त्यांच्या क्षमता व मर्यादा ओळखण्यात काही अंशी अपयश आल्याचे दिसते.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांची क्षमता ओळखून कामगिरी सोपवली होती. योग्य मार्गदर्शन, अचूक माहिती व अंदाज, यथार्थ व्यूहरचना व जनतेशी थेट संवाद या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे.

जाती-धर्मापेक्षा विकासाला चालना
श्रीवर्धन मतदारसंघात मुस्लीम व कुणबी हे निर्णायक ठरणारे घटक आहेत. ही व्होट बँक ठरावीक पक्षाची मानली जाते. मात्र, या वर्षी सर्व चित्र पालटले होते. मतदारसंघातील अनेक भागात मुस्लीम समाजातील तरुणाईने शिवसेनेत प्रवेश केला तर अनेक कुणबी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे नेपथ्य केले.

Web Title: Public opinion on development in Srivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.