वापरातील सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त, रोह्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:11 AM2019-07-19T00:11:16+5:302019-07-19T00:12:05+5:30
शहरातील शिवाजीनगरमधील सुस्थितीत वापरात असलेले सार्वजनिक शौचालय नगरपालिकेने जमीनदोस्त केल्याने सर्वत्र खळबळ माजली.
रोहा : शहरातील शिवाजीनगरमधील सुस्थितीत वापरात असलेले सार्वजनिक शौचालय नगरपालिकेने जमीनदोस्त केल्याने सर्वत्र खळबळ माजली. येथील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक हे शौचालय तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत नगरपालिकेला पत्राद्वारे जाब विचारला आहे. दुसरीकडे बिल्डरशी संगनमत करून शौचालय पाडले असल्याचा आरोप करीत नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध असे फलकच रहिवाशांनी परिसरात लावले आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोदी सरकार व राज्य शासन शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करीत असताना रोहा शहरात मात्र उलटेच घडले. शहरात पूर्वपार काही सार्वजनिक शौचालय आहेत. छत्रपती शिवाजीनगरमधील सार्वजनिक शौचालयही त्यापैकी एक. या परिसरात असलेली अन्य दोन शौचालये अडचणीच्या जागी असून त्यांच्या साठवणूक टाक्या साफ करता येत नाहीत, तसेच एक तर जंगलालगत असून या ठिकाणी सपांचा वावर असल्याने नागरिक भयभीत होऊन तेथे जात नाहीत. नागरिकांना सोयीचे तसेच मोक्याच्या जागी असलेले हे शौचालय पूर्वसूचना न देता जमीनदोस्त केल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे.
या शौचालयाची चार-पाच महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते पाडायचे होते मग दुरुस्ती का केली? असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. शौचालय तोडण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट का केले गेले नाही, तोडायचे होते तर मग दुरुस्ती का केली, हे स्थानिक नगरसेवकांनी बिल्डरच्या फायद्यासाठीच केले, असा आरोप ग्रामस्थ भालचंद्र पवार यांनी केला आहे. ग्रामस्थांच्या सह्या घेऊन याबाबत त्यांनी नगरपालिकेला पत्र लिहिले असून त्याच जागी सार्वजनिक शौचालय बांधून द्या, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे. रोह्यात चाललेय काय? असे हे शौचालय प्रकरण दिसत असून, त्यात आता रोहा शिवसेनेने उडी घेतल्याने शौचालय प्रकरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
>या शौचालयाची दुरवस्था झाली होती, त्याचे सर्व फोटो आम्ही काढून ठेवले आहेत, त्यामुळे ते जमीनदोस्त केले, त्या शौचालयाची चार-पाच महिन्यांपूर्वी दुरुस्ती का केली होती ते पाहावे लागेल.
- बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी,
रोहा नगरपालिका
एका बिल्डरच्या फायद्यासाठी नागरिकांना सोयीचे असलेले शौचालय जमीनदोस्त केले, आम्ही तेथील ग्रामस्थांच्या बाजूने आहोत, पालिकेने तातडीने त्याच ठिकाणी शौचालय बांधावे, दुसरे शौचालय जंगलालगत असून तिथे वीज नाही, आजूबाजूला सापांचा वावर असतो त्यामुळे जर एखादी दुर्घटना अथवा जीवितहानी घडली तर त्यास नगरपालिका जबाबदार असेल.
- समीर शेडगे, तालुकाप्रमुख, शिवसेना, रोहा