नेरळ-दहिवली पुलावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:31 AM2017-07-18T02:31:52+5:302017-07-18T02:31:52+5:30
कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग समजला जातो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र या मार्गावरील दहिवली पुलावर
- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग समजला जातो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र या मार्गावरील दहिवली पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पुलांवरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे पुलावरील वाहतूक धोकादायक बनली असून या पुलांवरील खड्डे लवकरात लवकर भरले नाहीत तर पूल कोसळू शकतो अशी भीती स्थानिक नागरिक, वाहन चालक, प्रवाशांकडून व्यक्त केली आहे.
नेरळ - कळंब या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. पुढे हा मार्ग कर्जत-मुरबाड राज्य मार्गाला जाऊन मिळतो. या मार्गावर मागील वर्षीपासून अनेक वेळा खड्डे भरण्याचे काम बांधकाम विभागाकडून झाले, परंतु ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याने आणि अधिकारी कामाची पाहणी करत नसल्याने निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दोन महिन्यांतच रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही झोपेचे सोंग घेतल्याने कोण आवरणार ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते.त्यामुळे संरक्षक पाइप पुराच्या पाण्याने वाहून जातात आणि रस्त्यावर कचरा, मोठमोठे खड्डे पडतात. यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.
या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. प्रवासी वाहनचालक, स्थानिक नागरिक या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. चार दिवसांपूर्वी या पुलावरून पुराचे पाणी गेल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे, परंतु याकडेही बांधकाम विभागाला लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुलाला हादरा बसून पावसात हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सुमारे ५० ते ६० गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आक्र मक भूमिका घेतली असून दोन दिवसांत दहिवली पुलावरील खड्डे भरले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
उंची वाढविण्याची मागणी
नेरळ-दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. तसेच संरक्षक कठडे पाण्याच्या प्रवाहात वाकतात तर काही रेलिंग वाहत जातात. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील काही पुलांच्या दुरु स्तीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. नेरळ-दहिवली पुलाचीही लवकरात लवकर पाहणी करून दुरु स्ती प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल व पुलावरील खड्डेही लवकर भरण्यात येतील.
- चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत
नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली पुलावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरील खड्डे जर लवकरात लवकर भरले नाहीत, तर हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलावरील रस्त्याचे खड्डे लवकर भरावे, अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल.
- यशवंत भवारे, ग्रामस्थ, दहिवली-नेरळ