कर्जत : नवरात्री आणि दसऱ्या निमित्त बाहेरी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेलमार्गे पुणे ते कामाख्या दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सोय केली परंतु या गाडीला कर्जतला थांबा न देऊन मध्य रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्याय करीत असल्याचा आरोप कर्जत रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या विशेष गाडीचा कर्जतला थांबा देण्यात आला होता तसाच थांबा या गाडीला देण्यात यावा अशी कर्जतकर प्रवाशांची इच्छा आहे. ही गाडी ६ आॅक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे. कर्जतला थांबा मिळण्यासाठी खासदारांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची व वेळ पडल्यास रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या गाडीचा व या पुढे प्रत्येक गाडीचा, जाता - येता, कर्जतला थांबा असावा हे किती आवश्यक आहे? ते रेल्वे प्रशासनास पटवून द्यावे व प्रत्येक गाडीचा कर्जतला थांबा मिळवून घ्यावा अशी विनंती कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी केली आहे. या गाडीच्या अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ७ -७ फे ऱ्या चालविण्यात येणार आहेत. ही गाडी ६ आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान दर गुरूवारी पुण्याहून सकाळी १० वाजून ३० मिनीटांनी सुटणार असून कामाक्याला तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ८२५०६ कामाख्या -पुणे सुविधा स्पेशल ट्रेन ३ सप्टेंबरपासून सुरु असून १४ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी रात्री १२ वाजता सुटणार आहे. तिसऱ्या दिवशी पनवेलला रात्री ११.३५ मिनीटांनी पोहचणार आहे. चौथ्या दिवशी म्हणजे गुरूवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनीटानी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीचा पनवेल, नाशिक रोड, भुसावळ, नागपूर , गोंदिया, दूर्ग, रायपूर, बिलासपूर, झारखंड, रूरकेला, चक्र धर, आसनसोल, मालदा, किसनगंज या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
पुणे - कामाख्या गाडीचा कर्जतला थांबा द्या
By admin | Published: September 13, 2016 2:38 AM