नवी मुंबई : शहरातील गांजा विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या अंबरनाथ व पुणे येथील गांजामाफियांना नेरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३९ किलो गांजा जप्त केला आहे. वर्षभरापासून पोलिसांनी गांजा माफियांविरोधात मोहीम तीव्र केली असून पहिल्यांदाच किरकोळ विक्रेत्यांना गांजा पुरविणाºयांना पकडण्यात यश मिळाले आहे.पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. सर्व पोलीस स्टेशन व अमली पदार्थ विरोधी पथकाला अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडी टाकून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. वर्षभर गांजा विक्री करणाºयांवर कारवाई केली जात होती. परंतु या विक्रेत्यांना गांजा पुरविणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. नेरूळमधील एल. पी. ब्रीजखाली गांजा विक्रेते येणार असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक भागोजी औटी, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या पथकाने ३ आॅगस्टला महामार्गावर पुलाखाली सापळा रचला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तेथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दुर्गापाडा ज्ञानअमृत स्कूलजवळ दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे अंबरनाथ येथे राहणाºया गुलाम मकसुद अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १५ किलो १६ ग्रॅम गांजाचा साठा सापडला आहे. पिंपरी-चिंचवड येथे राहणाºया मोहम्मद अब्दुल मज्जीद शेख याता ताब्यात घेतले असता त्याच्याकडे २४ किलो गांजा सापडला आहे. एकूण चार लाख रूपये किमतीचा ३९ किलो गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.नवी मुंबई पोलिसांनी एक वर्षात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, नवी मुंबईमध्ये कधीपासून गांजा पुरविण्याचे काम करत असून किती ठिकाणी गांजा पुरवितात याविषयी त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. गांजामाफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरूडे, परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त किरण पाटील यांनीही कारवाई करणाºया पथकाचे कौतुक केले आहे.
पुण्यासह अंबरनाथमधील गांजामाफियांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:50 AM