मुंबई पोर्ट ट्र्स्ट करणार ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ जहाजाची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:03 AM2019-02-16T02:03:56+5:302019-02-16T02:04:15+5:30
नव्याने सुरू होणाऱ्या रो-रो वाहतुकीसाठी ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) करणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तेथे रो-रो सेवेला प्रारंभ होणार आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : नव्याने सुरू होणाऱ्या रो-रो वाहतुकीसाठी ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) करणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तेथे रो-रो सेवेला प्रारंभ होणार आहे.
त्यामुळे सध्या या जहाजाचा वापर मुंबई ते दिघी आणि मुंबई ते नेरुळ येथील रो-रो सेवेसाठी करण्यात येणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येते.
जहाज खरेदीसाठी ४० कोटी रुपये खर्च असल्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट यासाठी स्वत:कडील १० कोटी आणि ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’, ‘महाराष्ट्र सागरी महामंडळ’ आणि ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ’ (सिडको) यांच्याकडून प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घेणार आहे.
जलवाहतुकीला प्राधान्य देणारे प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टने आखले आहेत. याअंतर्गत ‘रोपॅक्स’ जहाजाची खरेदी पोर्ट ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. यापूर्वी ‘रोपॅक्स’च्या खरेदीसाठी नेमलेले तीन कंत्राटदार जहाज प्रवाशांच्या सेवेत आणण्यात अयशस्वी झाले आहेत. त्यातील एका कंत्राटदाराने ‘एमएमबी’ विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने कंत्राटदारांकडून होणाºया रोपॅक्सच्या खरेदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे, त्यामुळे ‘बीपीटी’ने तीन संस्थांची आर्थिक मदत घेतली आहे.
- ‘रोपॅक्स’ या जहाजात दहा बस, सुमारे ६० गाड्या आणि २०० प्रवासी सामावून घेता येऊ शकतात.हे जहाज खरेदी करण्यासाठी जेएनपीटी, एमएमबी आणि सिडको प्रत्येकी दहा कोटी अर्थसाहाय्य करणार आहे.
- भाऊचा धक्का ते मांडवा या सेवेच्या माध्यमातून मिळणारा नफा चारही संस्था वाटून घेणार आहेत.
- याबाबतच्या निविदा लवकरच काढण्यात येऊन पुढील चार महिन्यांत मुंबई-दिघी आणि मुंबई- नेरळ या ठिकाणी रोपॅक्स प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.