रोह्यात राष्ट्रवादी-शेकापला धक्का; सेना-भाजपची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:54 AM2021-01-19T09:54:08+5:302021-01-19T09:54:56+5:30
वाशी ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गटाने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले आहे.
रोहा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी शेकापला पारंपरिक ग्रामपंचायतीमध्ये जोरदार धक्का बसला. राष्ट्रवादी पक्षाचे प्रबल्य असलेल्या रोठ बुद्रुकमध्ये सेना-भाजप युतीने मुसंडी मारली, तर बालेकिल्ला असलेल्या वाशी ग्रामपंचायतीमध्ये सुरेश मगर गटाने राष्ट्रवादीचा पाडाव करीत सर्वच्या सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला नो एंट्री केली आहे. या निकालात राष्ट्रवादीने १२ ग्रामपंचायतीवर सत्ता राखून तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवले. सेना भाजपने तालुक्यात शेकाप राष्ट्रवादीला रोखून धरत सहा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली. शेका पक्षाकडे दोन, तर वाशी ग्रामपंचायत अपक्ष सुरेश मगर गटाकडे गेली आहे.
वाशी ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गटाने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले आहे. रोठ खुर्दमध्ये जनार्दन मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने दिनेश मोरेंचा पराभव करीत येथे सत्ता स्थापन केली आहे. अलिबाग मतदारसंघातील शेणवई, शेडसई, वावे पोटगे ग्रामपंचायतीत शिवसेनेने दमदार मुसंडी मारत शेकापला विधानसभेनंतर दुसऱ्यांदा जोरदार दणका दिला. कोंडगाव, महाळुंगेवर शेकापने लाल बावटा फडकवला. सेना भाजपा युतीला शेणवई, शेडसई, वावेपोटगे, ऐनघर, निडीतर्फे अष्टमीत जोरदार एन्ट्री मिळाली आहे. खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी तिसे आपल्याकडे ठेवली.
धामणसई, मालसईत राष्ट्रवादी सेना आघाडीत बिघाडी झाली. याचा फटका सेनेला बसला. दोन्ही ग्रा.पं.तीवर राष्ट्रवादीने दमदार वर्चस्व राखले. तळाघर, घोसाळे, वरसेत राष्ट्रवादीला विजय मिळाले. नागोठणेतील पळसमध्ये राष्ट्रवादीचे शिवराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व पुन्हा कायम राहिले. ऐनघर ग्रामपंचायतीत शिवसेनेला तब्बल १४ जागा मिळाल्याने सेना प्रबळ ठरली. संबंध तालुक्याचे लक्ष लागलेल्या वाशीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर हे मास लीडर ठरले.