राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 01:45 AM2021-03-27T01:45:51+5:302021-03-27T06:22:32+5:30

साफसफाई करण्यास प्रशासनाकडून हयगय

Queen Jijau's palace neglected; Maintenance and repair of historic buildings | राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी

राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी

Next

सिकंदर अनवारे

दासगाव : किल्ले रायगडवरील थंड हवा, सोसाट्याचा वारा राजमाता जिजाऊ मासाहेब यांना वृद्धापकाळामुळे सोसवत नव्हता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य पाचाड गावाजवळ मासाहेबांकरिता प्रशस्त वाडा बांधला. या वाड्याला अतिशय भक्कम तटबंदी आहे. तटाची भिंत २ मीटरपेक्षा अधिक जाड असून, ४ मीटरपेक्षा उंच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाड्याची तटबंदी अनेक ठिकाणी जरी कोसळलेली दिसत असली तरी गत काळातील वैभवाच्या खुणा आजही दिसून येतात. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वाड्याच्या साफसफाईकडे भारतीय पुरातत्व विभागाप्रमाणे प्रशासनाकडूनदेखील दुर्लक्ष होत आहे.

वाड्यांच्या आतील आणि बाहेरील परिसरांमध्ये पावसामुळे सर्वत्र गवत उगवलेले आहे. सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. या स्थळाला भेट देण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांना, शिवभक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
     किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अत्यंत सुरक्षित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याकरिता वाडा बांधला. किल्ले रायगडावर जाण्याचा मुख्य रस्ता पाचाड गावांतून जात असल्याने शिवकालामध्ये हा परिसर पूर्णपणे संरक्षित असा होता. या गावांमध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे किल्ले रायगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सतत संपर्क राहात असे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीमध्ये मोठी बाजारपेठ होती, त्याचबरोबर महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रमुखांचे वाडे या परिसरात होते. वाडीला भेट दिल्यास सर्वत्र भग्न झालेल्या वास्तुंचे अवशेष दिसून येतात.

गेल्या अनेक वर्षांपासून गडाच्या परिसरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने खंडर तयार झाले आहेत. या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करण्यासाठी अनेक इतिहास तज्ज्ञ या परिसराला भेट देण्यासाठी येतात; परंतु कोणत्याही स्वरूपाची सुविधा नसल्याने पर्यटक आणि इतिहास प्रेमींची गैरसोय होते. या ठिकाणी शिवकालामध्ये दहा हजाराची शिवबंदी होती. पाचाड येथून किल्ले रायगडाला जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम येथील व्यापारी करीत होते. या परिसरांत असलेल्या जुने पाचाड, वाळसुरे, वाघोली, वाघेरी, छत्री निझामपूर, पुनाडे, रायगडवाडी, वारंगी, बावले, करमर, कावले, सावरट, नेराव, कोंझर, मांगरुण, सांदोशी, आमडोशी, खलई, देवघर, वरंडोली इत्यादी गावांचा संपर्क असल्याने पाचाड गावाला महत्त्व प्राप्त झाले होते.

शिवप्रेमींमध्ये नाराजी 
राजामाता जिाजाऊ मासाहेब यांच्याकरिता खास बांधण्यात आलेला वाडा अतिशय भक्कम आणि प्रशस्त होता. तटबंदीतून तोफा डागण्याची, गोळीबार करण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे होती. वाड्याच्या आतील भागांमध्ये दिवाणखाना, देवघर, शयनगृह, वृंदावन, दासींच्या खोल्या इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती; परंतु कालांतराने या सर्व वास्तू आज भग्नावस्थेमध्ये आहेत. वाड्याच्या तटबंदीमध्ये सुंदर शौचकुपे आहेत. तटावर जाण्यासाठी आतून जीने आहेत, वाड्यामध्ये दोन विहिरी असून, राजमाता जिजाऊ मासाहेब याच विहिरीच्या बाजूला बसून या परिसरांतील जनतेच्या समस्या सोडवित असत. सध्या या वाड्याची दुरुस्ती आणि देखभाल पुरातत्व विभागाकडे असून, या विभागाकडून योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या जागेवर मासाहेबांचे समाधीस्थळ आहे. हा ऐतिहासिक ठेवा असून, त्याचे जतन करण्याची गरज आहे. येत्या काही महिन्यांमध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमांतून या वाड्याचीदेखील दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.    

Web Title: Queen Jijau's palace neglected; Maintenance and repair of historic buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.