‘निर्माल्या’ चा प्रश्न गंभीर

By Admin | Published: September 26, 2015 01:08 AM2015-09-26T01:08:22+5:302015-09-26T01:08:23+5:30

गणेश विसर्जनाच्या वेळी समुद्र,खाडी, नद्या, तलावामध्ये टाकले जाणारे निर्माल्य आणि अन्य पूजेच्या साहित्यामुळे होणाऱ्या प्रदूषणास रोखण्याकरिता जनजागृतीची गरज असल्याचे पर्यावरण संरक्षण क्षेत्रात

The question of 'Creativity' is serious | ‘निर्माल्या’ चा प्रश्न गंभीर

‘निर्माल्या’ चा प्रश्न गंभीर

googlenewsNext

गणेश विसर्जनाच्या वेळी समुद्र,खाडी, नद्या, तलावामध्ये टाकले जाणारे निर्माल्य आणि अन्य पूजेच्या साहित्यामुळे होणाऱ्या प्रदूषणास रोखण्याकरिता जनजागृतीची गरज असल्याचे पर्यावरण संरक्षण क्षेत्रात कार्यरत अनेक कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशा प्रकारे निर्माल्य टाकू नये आणि पर्यावरणाचे संवर्धन करावे यासाठी लोकमतने घेतलेला हा आढावा.
धार्मिक भावना न दुखावता गणेशोत्सवादरम्यान घरोघर या संदर्भात लोकप्रबोधन करण्याची गरज असल्याचे येथील जेएसएम कॉलेजचे प्राचार्य तथा पर्यावरण तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले. गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीसोबत गूळ-पोह्यांची शिदोरी देण्याची प्रथा आहे. त्या निमित्ताने जलाशयातील मासे व अन्य जलचरांना खाद्य मिळते.
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जनाच्यावेळी आणि गणेश विसर्जनानंतर किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करतात. जिल्ह्यात बैठक सदस्यांच्या माध्यमातून गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते. लोकप्रबोधनातूनच निर्माल्य आणि अनुषंगिक गोष्टींमुळे होणारे जलप्रदूषण थांबविणे शक्य आहे, त्याकरिता शासन, स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून नियोजन करणे गरजेचे आहे.
----------
10 टन निर्माल्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उरण तहसील कार्यालयाच्या शिरावर येवून ठेपली आहे. दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. मात्र समुद्र किनाऱ्यावर जमा झालेल्या निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.
22 उरण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची फौज तयार करण्यात आली आहे. निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपषिदच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी कलश ठेवले असून निर्माल्य टाकण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
----
४उरण : जमा झालेल्या निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही पर्यावरणवादी, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला नाही. तलावात जमा होणारे निर्माल्य एकत्रित करण्यासाठी २२ उनप कर्मचाऱ्यांची फौज तयार केली आहे. निर्माल्य सर्वोदयवाडीतल्या घचकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नेवून योग्य विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद डवळे, अवेक्षक माने यांनी दिली.
४उरण परिसरातील एक दोन कंपन्यांनी मदत केली खरी मात्र पुरेशी मदत मिळाली नसल्याने उरण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीतून किनाऱ्यावरील निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण तहसील कार्यालयातील कर्मचारी तयारीला लागले आहेत. एक दोन कंपन्याकडून किनाऱ्याची साफसफाईसाठी टेम्पो, ट्रक, प्लास्टिकच्या पिशव्या आणि काही कर्मचाऱ्यांची मदत मिळणार आहे.
४उरण तहसील कार्यालयातील ७५ कर्मचाऱ्यांना निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली. गणेश विसर्जन मोरा समुद्र, भवरा तलाव, विमला तलावात केले जाते. येथे निर्माल्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.
----------
प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्याचे व्यवस्थापन
अलिबाग : गणेश चतुर्थीला दहा दिवसांसाठी आलेल्या बाप्पाला सर्वत्र निरोप देण्यात येणार आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना त्यासोबतच मोठ्या प्रमाणात निर्माल्यही पाण्यात टाकले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. विविध पर्यावरणप्रेमींनी या प्रश्नी आवाज उठवून गणेश भक्तांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासकीय यंत्रणा निर्माल्याचे वेगळे व्यवस्थापन करण्यास एक पाऊल पुढे आल्याचे त्या निमित्ताने समोर आले आहे.
अलिबाग नगरपालिका हद्दीमध्ये हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्राच्या पाण्यात केले जाते. विसर्जनावेळी निर्माल्याचे व्यवस्थापन गेली पाच-सहा वर्षांपासून करण्यात येत असून त्यांना काही पर्यावरणप्रेमी, जेएसएम महाविद्यालयीन युवक-युवतींची मोलाची मदत होत आहे.
विसर्जनस्थळी अलिबाग नगर पालिकेकडून निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केलेली असते. प्राप्त झालेल्या निर्माल्याचा साठा करुन त्या निर्माल्याचा वापर बायोगॅस प्रकल्प त्याचप्रमाणे कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी केला जात असल्याचे अलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
-------------
रेवदंडा : रेवदंड्यातील योगेश्वर महिला मंडळाने दीड दिवस, पाच दिवसांच्या गौरी-गणपती व दहा दिवशीय गणपती विसर्जन सोहळ्यासाठी येथील किनाऱ्यावर निर्माल्य संकलनासाठी खड्डा तयार केला असल्याचे मंडळाच्या अध्यक्ष आशा तांबडकर यांनी सांगितले, या निर्माल्यातून खतनिर्मिती करण्याचा विचार असून किनाऱ्यावर विसर्जन सोहळ्यानंतर भरतीच्या प्रसंगी निर्माल्य किनाऱ्यावर वाहत येत यामुळे किनाऱ्याला विद्रूप रुप येते. निर्माल्य पायाने तुडवले जात असे. किनारा स्वच्छ राहावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला दीड दिवशीय गणपती व गौरी विसर्जन सोहळ्याला प्रतिसाद मिळाला असून मंडळाचे सदस्य निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वत: पुढाकार घेत असून सरपंच शुभांगी गोंधळी यांनी उपक्रमाला भेट देवून मंडळाचे कौतुक केले आहे.
----------
निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन
महाड :निर्माल्य तसेच पूजेसाठी वापरलेले साहित्य आदीचे संकलन करण्याबाबत महाडमध्ये शासकीय यंत्रणांसह सेवाभावी संस्थांमध्ये देखील उदासीनता असल्याचे पाहायला मिळाले. गणरायाच्या विसर्जनाबरोबरच हे निर्माल्य सावित्री नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून देण्यावरच बहुतांश नागरिकांचा भर असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे निर्माल्य तेथे असलेल्या कलशात टाका असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
महाड शहरामध्ये जाखमाता घाट, रामघाट, राजघाट, भोईघाट या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. या सर्व विसर्जन घाटांच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाकरिता नगरपरिषदेने कचराकुंड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र विसर्जनासाठी आलेले नागरिक या कुंड्यांकडे दुर्लक्ष करुन निर्माल्य वाहत्या नदीच्या प्रवाह टाकतात याबाबत नाराजी व्यक्त करत पाणी दूषित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

Web Title: The question of 'Creativity' is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.