लोकमत न्यूज नेटवर्क तळोजा : गेल्या काही महिन्यांपासून तळोजा येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे सिडको वसाहतीत कचऱ्याची समस्या गंभीर झाली होती. गुरुवारी तळोजातील डम्पिंग ग्राउंडवर पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यास सुरुवात केली. मात्र सद्गुरू वामनबाबा संघर्ष समितीने डम्पिंग ग्राउंडच्या निषेधार्थ मोर्चा काढून शुक्रवारी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. जोपर्यंत आम्हाला विश्वासात घेऊन समितीसोबत सकारात्मक बैठक होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करू, असा इशारा या वेळी समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिला आहे.घोट चाळ परिसरातील सिडकोचे डंपिंग ग्राउंड गेल्या काही महिन्यांपासून स्थानिकांच्या आंदोलनामुळे बंद आहे. ते सुरू करण्यासाठी सिडको व पनवेल महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सुरू करू देणार नाही, असा निर्णय सद्गुरू वामनबाबा महाराज संघर्ष समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील यांनी घेतला आहे. सिडकोच्या घनकचरा प्रक्रि या केंद्रातून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील गावांच्या शेतात विहिरीत, बोअरवेल्समधील पाणी दूषित होत आहे. तसे नमुने देखील हाती आल्याने गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. मात्र अनेक महिने प्रक्रि या केंद्र बंद ठेवल्यानंतर सिडकोने व महापालिकेने हा प्रकल्प पोलीस संरक्षणात पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र स्थानिक व संघर्ष समितीने हा प्रकल्प सुरू करू देणार नाही, असा इशारा देत गुरुवारी आंदोलन केले.
डम्पिंगचा प्रश्न पुन्हा पेटला
By admin | Published: June 10, 2017 1:18 AM