जेएसडब्ल्यूच्या अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:36 AM2019-09-28T00:36:05+5:302019-09-28T00:36:18+5:30
वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्त्यांनी वेधले प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष
- मिलिंद अष्टिवकर
रोहा : रोहा रेल्वे स्थानकातून जेएसडब्ल्यू कंपनीच्या लोखंडी कच्चा माल वाहतुकीमुळे रेल्वे यार्डालगतच्या वसाहतीतील नागरिकांना होणारा वायू आणि जलप्रदूषणाचा त्रास, ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून होणारी वाहतूक ठेकेदारांच्या अरेरावीने नागरिक त्रस्त आहेत. या वाहतुकीवर बंदी आणावी अशी मागणी शासन दरबारी झाल्याने या प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी गुरुवारी रोह्याचे नूतन प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांचे लक्ष वेधले. वाहतुकीला शिस्त लागण्याबरोबर वाहतूकदारांच्या अरेरावीचा चोख बंदोबस्त करू असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
पेण येथील जेएसडब्ल्यूला लागणारा लोखंडी कच्चा माल हा रोहा रेल्वे यार्डात उतरविला जातो. जेएसडब्ल्यूला पेण रेल्वे यार्ड जवळचे असताना कच्चा माल रोहा यार्डात का उतरविला जातो ? रोहा ते पेण दूर अंतरावरून वाहतूक का केला जातो? हा संशोधनचा विषय ठरला आहे. त्यावर पेणवासीयांनी वायू व जलप्रदूषणाच्या कारणास्तव लोखंडी भुकटी उतरविण्यास विरोध दर्शविल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा रोहा रेल्वे यार्डात जेएसडब्ल्यूचा माल उतरविला जाऊ लागला. परिणामी समस्यांचा विळखा याविभागात जाणवू लागला. लोखंडाच्या भुकटीने संत रोहिदास नगर, मालसई, धामणसई येथील रस्त्यांची दुरवस्था झाली. माल वाहतूक करण्यासाठी चालक मालकांची स्पर्धा सुरू झाली. त्याच जेएसडब्ल्यूचा रोहा नगरपरिषद हद्दीत माल उतरविणे, त्यासाठी रोहा नगरपरिषदेची एनसी नाही, असे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितल्याने यामागे नेमके कोण सूत्रधार आहेत, माल वाहतुकीला कुणा बड्या नेत्याचा हात आहे, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
लोखंडी माल वाहतूक प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांची कार्यालयात शिष्टमंडळाने भेट घेतली. त्या वेळी या प्रश्नी तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाई झाली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे सांगितले. त्यावर क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, माल झाकून नेणे, वाहतूकदारांची अरेरावी खपवून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करीत कार्यवाहीबाबत ठोस आश्वासन प्रांताधिकारी डॉ. माने यांनी शिष्टमंडळाला दिले.