- जयंत धुळप अलिबाग : आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे प्रमुख कारण ‘दूषित पाणी’ हे आहे. त्यामुळे दरमहिन्याला जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जलस्रोतांचे नमुने संकलित करण्यात येतात. हे पाण्याचे नमुने अलिबाग येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि कर्जत, पेण, रोहा, माणगाव आणि महाड या उप विभागीय आरोग्य प्रयोगशाळेत अणुजीव तपासणीकरिता पाठविण्यात येतात. मात्र जुलै २०१८ या महिन्यात कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, तळा आणि उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून जलनमुने आले नसल्याने या सहा तालुक्यांतील एकूण २८ जलनमुने चाचणीचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून देण्यात आलेला नाही. परिणामी या सहा तालुक्यांतील पाणी नमुने तपासणी अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जत तालुक्यातील आंबिवली, कडाव, कळंब, खांडस, नेरळ, खालापूर तालुक्यातील चौक, खालापूर, वावोशी, महाड तालुक्यातील बिरवाडी, चिंभावे, दासगाव, पाचाड, वरंध, विन्हेरे, माणगाव तालुक्यातील इंदापूर, गोरेगाव, नांदवी, निजामपूर, साई, शिरवली, म्हसळा तालुक्यातील खामगाव, पनवेल तालुक्यात आजिवली व आपटा, पेणमध्ये जिते व कामार्ले, सुधागडमध्ये पाली, तळा तालुक्यात तळा व उरण तालुक्यातील कोप्रोली अशा एकूण २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील पाणी नमुने प्रयोगशाळेत पोहोचले नसल्याने येथील अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने निरंक दाखविले आहेत.शासनाच्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील सर्व ८०७ ग्रामपंचायतींमध्ये ‘जलसुरक्षक’ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाणी नमुने घेवून ते प्रयोगशाळेत पाठविणे, चाचणीचे अहवाल आल्यावर पाणी शुद्धीकरण करणे गरजेचे असल्यास त्यासाठीची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करुन जलस्रोत शुद्ध करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे ही कामे ‘जलसुरक्षक’ यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील नंदकुमार गायकर यांनी दिली.पाणी व स्वच्छता विभाग, ‘जलसुरक्षक’ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी समन्वय आवश्यक‘जलसुरक्षक’ यांनी पाणी नमुने तपासणीकरिता दिले किंवा नाहीत, त्यांनी दिलेल्या पाणी नमुन्यांचे परीक्षण अहवाल काय आले, दूषित पाणी नमुन्यांच्या स्रोत शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी व स्वच्छता विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणी नमुने तपासणीचा संकलित अहवाल उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. ‘जलसुरक्षक’ यांचा समन्वय या तीनही यंत्रणांशी नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.दरमहिन्याला जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जलस्रोतांचे नमुने संकलित करण्यात येतात>पाणी नमुन्यांचा अहवाल पंचायत समितीकडेजिल्ह्यातील कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, तळा आणि उरण या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पाणी नमुने तपासणी अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात निरंक दिसत आहे. त्या ठिकाणचे पाणी नमुने ‘जलसुरक्षक’ यांच्या माध्यमातून देण्यात आलेले असणार. त्यांनी दिलेल्या पाणी नमुने तपासणी अहवाल संबंधित पंचायत समित्यांकडे येतो, तो आमच्याकडे येत नसल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.
पाणी शुद्धता अहवालावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:52 AM