ऑनलाइन शिक्षणावर प्रश्नचिन्ह; अभ्यासक्रम कमी करून दोन सत्रांत परीक्षा घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:14 AM2020-05-27T01:14:36+5:302020-05-27T01:14:51+5:30
शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सूर
- आविष्कार देसाई
अलिबाग : लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्राला लागलेले टाळे उघडण्याची सरकारची मानसिकता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारी आहे. अभ्यासक्रम कमी करून दोनच सत्रांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असा एक प्रयोग पुढे येत आहे. मात्र, आॅनलाइन शिक्षण पद्धती हा त्यावरचा एकमेव उपाय नाही, असाही सूर शिक्षण तज्ज्ञांकडून आळवला जात आहे.
कोरोनाने बहुतांश जगाला आपल्या विळख्यात घट्ट पकडले आहे. कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा मुकाबला करताना दुसरीकडे रेंगाळलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने नियमांत शिथिलता आणली आहे. त्यामुळे कंपन्या, छोटेमोठे उद्योग-व्यवसाय, दुकाने, शेती, मत्स्य व्यवसाय यांच्या व्यवहारांना गती प्राप्त होत आहे.
कोरोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रही त्यापासून दूर राहिलेले नाही. मार्च-एप्रिल हा परीक्षांचा हंगाम असतो आणि त्यानंतर उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या जातात. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असल्याने देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार, कामकाज ठप्प पडले.
शिक्षण क्षेत्रातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउन सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. जून महिन्यापासून शाळा सुरु होतात मात्र शैक्षणीक सत्र कधी सुरू होणार याबाबत अद्यापही सरकारने स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. कोरोना वाढत असल्याने आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे, अशी भीती कायम सतावत आहे; परंतु त्यांच्या शिक्षणाचेही नुकसान झाले नाही पाहिजे, अशी पालकांची मानसिकता असल्याचे दिसून येते.
सरकार आॅनलाइन शिक्षण घेण्याबाबत आग्रह धरत आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाकडे मोबाइल, लॅपटॉप नाहीत; तसेच इंटरनेटची असुविधा आणि विशेष म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आवश्यक असलेला ह्युमन टच आॅनलाइन शिक्षण पद्धतीत राहणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी किती वेळ मोबाइल, लॅपटॉपपुढे बसून राहायचे, हाही प्रश्न आहे. शिवाय त्या अनुषंगाने मुलांना पाठीची, मानेची दुखणी होऊ शकतात.
याच कारणांनी आॅनलाइन शिक्षण पद्धती सुरू करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याचे बोलले जाते.
जून महिन्यात शाळा सुरू करणे आज शक्य होणार नाही. कारण शाळांच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, असाही सूर ऐकायला मिळत आहे.
पीटी, चित्रकला, संगीत विषय वगळावेत
कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून ठरलेल्या वेळेनुसारच शाळा सुरू करण्याचा काही शिक्षण संस्थांचा कल आहे. एक दिवस अर्धे विद्यार्थी आणि दुसऱ्या दिवशी अर्धे विद्यार्थी अशा पद्धतीने केल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य होईल.
अभ्यासक्रम कमी करावा, पीटी, चित्रकला, संगीत, क्राफ्ट असे विषय वगळावेत; जेणेकरून तो वेळ अन्य विषयांसाठी शिक्षकांना शिकवताना उपयोगी पडेल. त्यामुळे वेळापत्रक आपोआप कमी होईल. परीक्षा दोनच सत्रांत घ्याव्यात (सहामाही आणि वार्षिक). तोंडी परीक्षा रद्द कराव्यात, त्यामुळे अधिक वेळ मिळू शकेल.
कोरोना अधिक कालावधीसाठी सर्वत्र राहणार असल्याने कोरोनासोबतच जगावे लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच
जाहीर केलेले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा हेच सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेताना त्यांचे आरोग्य कसे सुरक्षित राहील याचाही विचार सरकार आणि समाजाला करावा लागणार आहे.
मुलांच्या भवितव्याचा विचार करता शाळा बंद करून चालणार नाही. अद्याप सर्वदूर तंत्रज्ञान पोहोचलेले नाही. त्यामुळे सर्वांना आॅनलाइन शिक्षण देता येईल हा समज साफ चुकीचा आहे. उपस्थिती कमी करून, दिवसातून एकदा अथवा तीन दिवसांतून एकदा शाळा सुरू ठेवता येईल. राष्ट्रहीत म्हणून शिक्षकांनी त्रास सहन करणे गरजेचे आहे.
- डॉ. सचिन पाटील, अध्यक्ष,
रिसोर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट
१५ जून रोजी शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे शाळा सुरू करणे, जास्त असणाºया ठिकाणी बंद ठेवणे, तर अन्य ठिकाणी सम-विषम पद्धतीने उपस्थिती ठेवून सामाजिक अंतर राखून शाळा सुरू करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र हा अंतिम निर्णय नाही.
- भाऊसाहेब थोरात, शिक्षणाधिकारी माध्यमिक
कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शाळा जून महिन्यात सुरू झाल्या तरी मुलांना कोणाच्या जबाबदारीवर पाठवायचे, तर दुसरीकडे शाळेत न गेल्याने त्यांचे नुकसानही होणार आहे. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने यातून लवकर मार्ग काढावा.
- धनंजय कवठेकर, पालक
सरकारने शाळा सुरू करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बाबतीतील नियमांचे पालन करून शाळा सुरू करणे शक्य आहे. एक दिवशी मुले आणि एक दिवशी मुली या पद्धतीने शाळेत सामाजिक अंतर राखता येईल. तसेच शाळांनी काय शिकविले पाहिजे याचा अभ्यासक्रम दिला पाहिजे. अभ्यासक्रम कमी करावा. महत्त्वाचे विषय ठेवून अन्य विषय वगळण्यात यावेत. त्यामुळे अधिक वेळ शिक्षकांना शिकवण्यासाठी वापरता येईल. आॅनलाइनमुळे प्रश्न अधिक जटिल होतील. - अमर वार्डे, अध्यक्ष, डीकेएटी