अलिबाग : मांडवा-मुंबई रो-रोच्या कामात ठेकेदाराला मंजूर निविदेपेक्षा तब्बल ३१ कोटी ६४ लाख ९९ हजार ९९२ रुपयांची रक्कम वाढवून दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. या प्रकरणी मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी नागोठणे येथील रजनिकांत पाटील यांनी गृहविभागाकडे केली आहे.मांडवा येथे गाळ काढण्याच्या २० कोटी रुपयांच्या कामाबाबत अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी आधीच तक्रार केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीही सुरू केलेली आहे. त्यातच आता रजनिकांत पाटील यांनीही यातील गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे. त्यामुळे सुमारे ५१ कोटी ६४ लाख रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रजनिकांत पाटील यांनी सरकारकडे केलेल्या तक्र ारीमध्ये मांडवा येथील ब्रेक्रिं ग वॉटरच्या (लाट विरोध भिंत) १३५ कोटी २९ लाख रुपयांच्या कामासाठी मेरीटाइम बोर्डाने १६ आॅक्टोबर २०१५ रोजी तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर गृहविभागाने या कामाला २२ जानेवारी २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. हे काम मेरीटाइम बोर्डाने निविदाधारक मे. डी. व्ही. पवार यांना ११ टक्के कमी दराने म्हणजेच ११५ कोटी ७६ लाख ८७ हजार ९८० एवढ्या रकमेला मंजूर केले; परंतु मेरीटाइम बोर्डाने सरकारकडून २२ जानेवारी २०१६ ला प्रशासकीय मान्यता मिळण्याआधीच या कामाला १६ आॅक्टोबर २०१५ रोजी अवैधरीत्या तांत्रिक मंजुरीचे आदेश दिल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.रजनिकांत पाटील यांनी मांडवा येथील ब्रेक्रिं ग वॉटरच्या (लाट विरोध भिंत) कामासाठी प्राप्त झालेल्या दोन निविदा (निविदा रक्कम १३० कोटी सात लाख ७३ हजार १२ रुपये) २७ जून २०१६ रोजी उघडण्यात येऊन निविदाधारक मे.डी.व्ही. पवार यांना ११ टक्के कमी दराने म्हणजे ११५ कोटी ७६ लाख ८७ हजार ९८० या रकमेला निविदा मंजूर केली.यातील महत्त्वाची बाब म्हणजे या कामासाठी किमान तीन निविदा प्राप्त होणे गरजेचे होते; परंतु फेरनिविदा न मागवता मेरीटाइम बोर्डाने प्राप्त झालेल्या दोन निविदा ग्राह्य धरल्या आणि मे.डी.व्ही. पवार यांची निविदा मंजूर केली गेली. या कामामध्ये स्थानिक परवानगी तसेच जागा महसूल खात्याची असल्याने त्यांच्याही आवश्यक त्या परवानगी घेतल्या नसल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.मेरीटाइम बोर्डाच्या वित्तीय नियंत्रक तथा मुख्य लेखा अधिकारी यांच्याकडील प्राप्त कागदपत्रांनुसार मांडवा येथील ब्रेक्रिं ग वॉटरच्या (लाट विरोध भिंत) कामाची मंजूर निविदा ११५ कोटी ७६ लाख ६७ हजार ९८० या रकमेची असताना संबंधित ठेकेदाराला १४७ कोटी ४१ लाख ८७ हजार ९९२ इतकी रक्कम देण्यात आली आहे, म्हणजेच ठेकेदाराला मंजूर टेंडरपेक्षा ३१ कोटी ६४ लाख ९९ हजार ९९२ रुपये इतकी रक्कम वाढवून दिली आहे. त्यामुळे इतकी रक्कम बेकायदेशीररीत्या वाढवून दिल्याबद्दल मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून अतिरिक्त अदा केलेली ३१ कोटी ६४ लाख ९९ हजार ९९२ रुपये इतकी रक्कम संबंधितांकडून वसूल करून सरकारी तिजोरीत जमा करावी, अशी मागणी पाटील यांनी राज्याच्या गृहविभागाकडे केली आहे.या कामासाठी ग्लोबल जाहिरात देण्यात आली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली होती. नियमात बसलेल्यांची निविदा मंजूर करण्यात आली. त्यानंतर काम पूर्ण झाले. मुख्य सचिव, सचिव, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याच कामात काही आवश्यक बदल सुचवले होते. त्यानुसार कामात वाढ झाली. प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, तेवढा खर्च करता येतो. त्यामुळे या कामात कोणाताही भ्रष्टाचार, गैरव्यवहार झालेला नाही.- सुधीर देवरे, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड
मांडवा रो-रो सेवेच्या ५१ कोटी रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 2:51 AM