दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या महाड विन्हेरे नातूनगर रस्त्याची दुरुस्ती करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. जोपर्यंत आमचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही, असा इशाराच या ग्रामस्थांनी दिला आहे. गेली काही वर्षे विन्हेरे परिसरातील ग्रामस्थ आपल्या मोबदल्यासाठी झटत आहेत.महाडमधून विन्हेरे मार्गे नातूनगर खेड असा एक मार्ग आहे. या मार्गावर शिरगाव, कुर्ले, रेवतळे फाटा, करंजाडी, विन्हेरे, फाळकेवाडी अशी गावे येतात. ऐन पावसाळ्यात कशेडी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यास किंवा गणेशोत्सवात होत असलेल्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. सन १९८७ रोजी हा मार्ग मंजूर झाला होता, तर सन १९९७ रोजी या मार्गाचे काम करण्यात आले होते. सन २००५ मध्ये कशेडी घाट बंद राहिल्याने या मार्गाचा वापर झाला होता. यामुळे या मार्गाला पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. या रस्त्याला तत्काळ पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात आला होता. यामुळे रस्त्यावरील गावांची आणि रस्त्यापासून लांब असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली. या मार्गाचे पर्यायी महामार्गाकरिता २००५मध्ये रस्ता रुंदीकरण झाले. यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रुंदीकरणाच्या कामात बाधित झाल्या त्या लोकांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही. जवळपास ६० शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये बाधित झाल्या आहेत. मोबदला मिळावा म्हणून अनेक दिवस या शेतकºयांचा लढा सुरू आहे.सध्या या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दुरुस्तीमध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकºयांनी हरकत घेतली आहे. गेली अनेक वर्षे शेतकरी मोबदल्यासाठी फेºया मारत असल्याने शेतकºयांनी दुरुस्तीचे काम थांबवण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक शेतकºयांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग बांधकाम विभाग, प्रांत कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत कोणतीच कायदेशीर कारवाई झालेली नाही. शिवाय मोबदलाही दिला गेलेला नाही असे असताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मात्र निधी दिला जात असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाऊ दिले जाणार, असा इशाराच स्थानिक शेतकरी प्रभाकर विन्हेरकर, पांडुरंग थरवळ, बबन मोरे, चंद्रकांत मोरे, विजय शिंदे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
विन्हेरे रस्त्याच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:54 AM