बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:28 PM2019-12-11T23:28:41+5:302019-12-11T23:28:44+5:30
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पाहणी दौरा
पेण : तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारला जाग आली असून, बाधितांचे पुनर्वसन ज्या जागेवर होणार आहे, त्या वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी व मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या ठिकाणी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बाधितांच्या पुनर्वसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पेण वरसई व जावळी निफाड खोºयातील बाळगंगा नदी तटावरील ९ महसुली गावे १३ वाड्यावरील ३३४० कुटुंबे बाळगंगा मध्यम प्रकल्पामुळे बाधित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी अनेकदा पाहणी दौरे झाले आहेत. नऊ वर्षांत जमिनीला योग्य मोबदला व प्रकल्पगस्तांचे पुनर्वसन यासाठी रस्त्यावर व कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांवर खटलेही दाखल झाले. मात्र, बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी माघार घेतली नाही. अखेर बुधवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी-कर्मचाºयांसह बाळगंगा धरण प्रकल्पच्या ठिकाणी पाहणी केली. त्याबरोबरच वाशिवली, वरसई, व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी केली आहे.
पाहणी दौºयाप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी शितोळे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ, कार्यकारी अभियंता राजभोरा मॅडम, सिडकोचे अधिकारी काळे, पेण तहसीलदार डॉ. सुवर्णा जाधव, प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार, यांच्यासह बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील, गागोदे सरपंच शिवाजी पाटील, भरत कदम, बी. बी. पाटील, जयंत नारकर, वरसई सरपंच जयश्री भेसरे आदी उपस्थित होते. बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी स्वत: लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे नवीन वर्षात बाळगंगा मध्यम प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच बाधितांचे नव्या जागेत स्थलांतर व पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.