महाबळेश्वर घाटात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:17 AM2018-07-30T04:17:46+5:302018-07-30T04:17:56+5:30
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे.
- संदीप जाधव
महाड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे.
दापोलीच्या कोकण कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहलीसाठी महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस आंबेनळी घाटातील दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे दोन वर्षांपूर्वी महाडजवळ घडलेल्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आठवणी रायगडवासीयांमध्ये पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. ३१ जुलै २०१६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेत निष्पाप ४० प्रवाशांचे बळी गेले होते. त्यावेळी तब्बल महिनाभर नदीपात्रात मृतदेहांची शोधमोहीम सुरू होती.
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते पुणे- बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील दहीवडी (राज्यमार्ग क्र . १३९) हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा समजला जातो. मात्र, घाटमार्गावर वारंवार घडणाºया अपघातांमुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. पोलादपूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई ते दहीवडीपर्यंतच्या नव्वद किमी मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून त्याची युद्धपातळीवरून अंमलबजावणी होण्याची खरी गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. हा मार्ग अरुंद, धोकादायक, सुरक्षेचा दृष्टीने सोयीचा नसला तरी दुसरा योग्य पर्यायी मार्ग नसल्याने पर्यटक, तसेच महाड औद्योगिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातून येणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून एमआयडीसी परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाºया वाहनांचीही वर्दळ असते.
पोलादपूर ते आंबेनळी हा (२४.२००) रस्ता सार्वजनिक बांधकाम, महाडच्या अखत्यारीत आहे तर त्यापुढील दहीवडीपर्यंतच्या मार्गाच्या देखभाल दुरु स्तीची जबाबदारी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. महाड विभागाने आपल्या अखत्यारीतील रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरणाचे काम केले असले तरी अरु ंद मार्ग, तसेच धोकादायक वळणांमुळे हा घाटमार्ग प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे.
या मार्गावर आंबेनळी घाटासह पाचगणी ते वाई मार्गावरील पसरणी घाट देखील वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. पसरणी घाटातही वाहने दरीत कोसळण्याच्या दुर्घटना अनेकदा घडून प्रवाशांचे बळी गेले आहेत. मात्र, या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाहनांच्या अपघातांसह या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील पावसाळ्यात नियमितपणे घडतात, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अनेकदा बंद ठेवला जातो. सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे या मार्गावर प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर तरी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वा सुरक्षिततेसाठी शासनाने जलदगतीने चालना द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.