रायगडमधील अंगणवाड्यांत सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:29 AM2017-07-31T03:29:19+5:302017-07-31T03:29:19+5:30
अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे धोरण सरकार आखत आहे, तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात १८३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे आणि ८२ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
अलिबाग : अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे धोरण सरकार आखत आहे, तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात १८३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे आणि ८२ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे तेथील अंगणवाडी सेविका, मदतनीस, चिमुकल्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण तीन हजार २८३ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये दोन हजार ६७९ अंगणवाड्या आणि ६०४ मिनी अंगणवाड्या आहेत. तब्बल एक लाख ५५ हजार ३४० चिमुकले येथे येतात.
रायगड जिल्ह्यातील १७ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या अंगणवाड्यांमधील १८३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत. यामध्ये ६५ अंगणवाड्या आणि ११८ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे.