- मधुकर ठाकूरउरण - उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.
पावसाळ्यात भात पीक घेतल्यानंतर जमिनी ओसाड ठेवण्यापेक्षा आणि नाहक वेळ वाया घालविण्यापेक्षा रब्बी हंगामातील पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.पावसाचा हंगामातील भातपीक हाती आल्यानंतर व पाऊस थांबल्यावर आता शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर, पावटा, घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्यांच्या पीकांची लागवड केली आहे.परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने कडधान्य लागवडीस थोडासा विलंब झाला होता.त्यामुळे रब्बीच्या सुरू असलेल्या हंगामात कडधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये थोडीशी साशंकताच निर्माण झाली होती.मात्र आता शेतात लागवड केलेल्या कडधान्य पिकांना चांगलाच बहर आल्याने दिसून येत आहे.
तर अधून-मधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरते आहे. पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतील.मात्र ढगाळ वातावरण व कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर अखेरच्या मोसमापर्यंत सर्वच पिकातून चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी व्यक्त केला असुन येथील शेतकरी वर्गातून समाधानही व्यक्त केले जात आहे.