स्टील कारखान्यात राडा
By admin | Published: March 22, 2017 01:35 AM2017-03-22T01:35:40+5:302017-03-22T01:35:40+5:30
सावरोली येथील भूषण स्टील कारखान्यात कामगार संघटनेमधील वाद उफाळला असून, एका परप्रांतीय कामगाराला जबर मारहाण
वावोशी : सावरोली येथील भूषण स्टील कारखान्यात कामगार संघटनेमधील वाद उफाळला असून, एका परप्रांतीय कामगाराला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर घडली.
भूषण स्टील कारखान्यात दोन कामगार संघटना असून, या संघटनेत नेहमीच वाद सुरू असतात. भूषण कारखाना व्यवस्थापनाने या वादातून काही कामगार प्रतिनिधी व कामगारांना निलंबित केले होते. निलंबित कामगार प्रतिनिधी सुनील दिसले व त्यांचे सहकारी मंगळवारी भूषण कारखान्याच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले होते. या कारखान्यात काम करणारा उदयभान जयप्रकाश सिंग (२६) हा कामगार त्याची रात्रपाळी संपल्यानंतर उपोषणाला बसलेल्या कामगार सहकाऱ्यांना भेटायला जात असताना सकाळी सव्वाआठच्या सुमारास विरुद्ध गटातील कामगार संघटनेतील समीर पाटील, अनंता पाटील, अल्पेश चौधरी, प्रमोद देशमुख, गणेश घाटवळ, नागेश मेहतर व इतर चार ते पाच गावगुंडानी उदयभानला अडवून त्याला जबर मारहाण केली. मारहाणीत उदयभानला गंभीर दुखापत झाली. मारहाण करणारे पळून गेल्यानंतर भूषण स्टील कारखान्यातील सहकारी व सुरक्षारक्षकांनी उदयभानला उपचारासाठी खालापूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एमजीएम कामोठे येथे पाठविले आहे. उदयभान सिंग याने मारहाण करणाऱ्यांना विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)