जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:43 AM2020-08-08T01:43:20+5:302020-08-08T01:43:40+5:30
पनवेलमध्ये नियमांचे उल्लंघन : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची धाड
पनवेल : खासगी कोविड रुग्णालयांच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर जादा बिल वसूल केल्याच्या तक्रारी वाढत असताना, शुक्रवारी, ७ आॅगस्टला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांनी अचानक पनवेल पालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांना भेटी देत रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला. या भेटीत मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांची लूट सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुपारी १२च्या दरम्यान पालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयांना डॉ.सुधाकर शिंदे यांनी भेटी दिल्या. मात्र, या भेटीदरम्यान एकाही रुग्णालयाने शासनाने ठरविलेल्या दरपत्रकानुसार उपचार केले नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोविड रुग्णांवर उपचार करीत असताना दरपत्रकाराची यादी रुग्णालयातील दर्शनीय भागात लावणे गरजेचे असताना, एकाही रुग्णालयाने ही यादी लावली नसल्याचे डॉ.सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
कळंबोलीमधील सुश्रुत कोविड १९ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलने ज्यादा दरपत्रकाची यादी रुग्णालयात लावल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी ही यादी काढून टाकण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या रुग्णालयांच्या माध्यमातून उपचाराच्या नावाने जादा बिल आकारले जात असल्याचे निदर्शनास आले असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले. राज्यभरात ज्यादा बिल आकारणी करणाºया खासगी कोविड रुग्णालयांना अचानक भेट देऊन आढावा घेत आहोत. पनवेलमधील भेट अशाच प्रकारची होती, असे शिंदे यांनी सांगितले.
पनवेल पालिका हद्दीतील रु ग्णालये
पनवेल महानगरपालिका हद्दीत खारघरमधील पोलारिस हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, तर कळंबोलीमधील सुअस्था हॉस्पिटल, सत्यम हॉस्पिटल, सुश्रुत कोविड १९ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल या खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
पनवेलमधील खासगी रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांकडून जादा बिल आकारला जात आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले आहेत, ते त्यांना परत करण्यासंदर्भात निर्णय या आॅडिट रिपोर्टनुसार घेण्यात येईल.
- डॉ.सुधाकर शिंदे