रायगडमध्ये पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन, किराणा माल, भाजीपाला विक्री बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 07:46 PM2020-07-13T19:46:19+5:302020-07-13T19:46:52+5:30
औषध आणि दुध विक्री सुरु
रायगड - जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 24 जुलैच्यामध्यरात्रीपर्यंत कडक लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये भाजीपाला, किराणा मालाची दुकाने बंद राहणार आहेत तर औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत,अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. नागरिकांना याचा त्रास हाेणार आहे मात्र सर्वांच्या भवितव्याचा विचार करुन हा निर्णय घेत असल्याने सर्वांनी सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्व समावेशक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मार्च ते मे महिन्यापर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले होते. त्यानंतर टप्याटप्याने लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यावर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सव्वा दोनश कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. सरकार आणि प्रशासनासमोर मोठी दुखी ठरत आहे. नागरिकांमध्येही याबाबत प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सरकार आणि प्रशासनाला आता जाग आली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन घेण्यात येत असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले.
अत्यावश्यक सेवेतील कंपन्या, रासायनिक कंपन्या, औषधांची दुकाने, दुध यांना लॉकडाऊनमधून वगळ्यात आले आहे. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, दारु विक्री यासह अन्य दुकाने बंद राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या स्वराज्य संस्थांनी आधीच लॉकडाऊन जाहीर केले आहे. ते तसेच पुढे सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना इपास घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यात सध्याची परिस्थीती पाहात काेराेना बाधीतांचा आकडा 10 हजारांचा टप्पा आेलांडण्याची शक्यता असल्याने पुढील कालावधीत तेवढ्याच बेडचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सध्या 300 बेडला आॅक्सीजनची सुविधा आहे. लवकरच त्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. अलिबाग येथील आरसीएफचे रुग्णालय, खालापूर येथील मोहिते हॉस्पीटल, पेण येथील नाट्यगृह, साळाव येथील हाॅस्पीटल काेवीडच्या उपचारासाठी घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरांची सेवाही घेण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
---
कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्धतेबाबत आता प्रांताधिकारी कार्यालयातून माहिती मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा अधिकारी आणि महसूल विभागातील कर्मचारी यांचे यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्ह्यातील काेणत्या रुग्णालयामध्ये किती बेड रिकामे आहेत, व्हेंटीलेटरचे बेड किती आहेत. याची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी या नियंत्रण कक्षासंपर्क साधण्यासाठी स्वतंत्र फाेन नंबर देण्यात येणार आहे.
-------
औषधांच्या दुकांनामध्ये लॉकडाऊन कालावधीत बेकरी प्रॉडक्टस विकता येणार नाहीत. त्यामुळे खरोखर ज्यांना औषधांची गरज असेल, तेच नागरिक घराबाहेर पडतील.
------
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच रासायनिक कंपन्या सुरुच राहणार आहेत. अन्य कंपन्यांनी आपला कर्मचारी वर्ग 10 टक्क्यांवर आणावा असेही आवाहन तटकरे यांनी केले आहे.
-----
खारपाडा, खोपोली, ताम्हाणी घाट पोलादपूर या ठिकाणी चेक पोस्ट पुन्हा कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे इ पास असणाऱ्यांच प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्यांना ट्रॅकींग सिस्टीमद्वारे ट्रॅक करण्यात येणार आहे. त्यामुळे येणारे नागरिक कोणत्या गावात गेलेत यावर नजर ठेवता येणार आहे.