Raigad: ३०६१ मतदार घरूनच करणार मतदान, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी सुविधा
By निखिल म्हात्रे | Published: April 22, 2024 12:50 PM2024-04-22T12:50:57+5:302024-04-22T12:51:43+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: यावर्षी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरूनच मतदानाची व्यवस्था केली असून रायगडमधून आतापर्यंत ३०६१ मतदारांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३९ हजार ७४ इतके हे मतदार आहेत.
- निखिल म्हात्रे
अलिबाग - यावर्षी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरूनच मतदानाची व्यवस्था केली असून रायगडमधून आतापर्यंत ३०६१ मतदारांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३९ हजार ७४ इतके हे मतदार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३९ हजार ७४ एवढे वृद्ध आणि दिव्यांग मतदार आहेत. यापैकी अनेकांना मतदान केंद्रावर जात मतदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने ४० टक्क्यापेक्षा जास्त अंपगत्व असलेल्या दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी या मतदारांना फार्म १२ ड भरून नोंदणी करायची होती. रायगड मतदार संघातून आतापर्यंत तीन हजार ६१ मतदारांनी हा गृहमतदानाचा पर्याय स्वीकारला आहे.
अजूनही प्रक्रिया सुरू
सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीची ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे, त्याचा आकडा ३० एप्रिलनंतर समजू शकेल, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे होते गृहमतदान
ज्या मतदारांनी घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडला त्यांची यादी तयार केली जाते. मतदानाला आठ दिवस शिल्लक असताना गृहमतदानाची प्रक्रिया सुरू होते. पोलिंग पथक संबंधित मतदाराच्या घरी पोहोचते. पोस्टल बॅलेट पेपरद्वारे अतिशय गोपनीय पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते.