- निखिल म्हात्रे अलिबाग - कोकण पदविधरसाठी रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रावर 54 हजार 208 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे 486 अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर कोकण पदविधर निवडणूकीचे बिगूल वाजले होते. मागील 20 दिवसांपासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती त्याला आता पुर्ण विराम मिळाला आहे. आज पार पडणाऱ्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 81 मतदान केंद्रावर 81 मतदान अधिकारी, 243 सहाय्यक मतदान अधिकारी, 81 शिपाई, 81 पोलिस कर्मचारी असे एकूण 486 अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्हयात एकूण 81 मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र आणि मतदार हे पनवेल विधानसभा मतदार संघात आहेत. 1 जानेवारी 2024 पर्यंत पनवेल विधानसभा मतदार संघात 9 मतदान केंद्रांसाठी 20 हजार 71, उरण विधानसभा मतदार संघात दोन मतदान केंद्रांसाठी 3 हजार 825, कर्जत विधानसभा मतदार संघात तीन मतदान केंद्रांसाठी 6 हजार 646, पेण विधानसभा मतदार संघात 6 हजार 704, अलिबाग विधानसभा मतदार संघात 5 हजार 291, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 7 हजार 737, महाड विधानसभा मतदार संघात 3 हजार 934 अशा एकूण 54 हजार 208 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुष मतदार 30 हजार 843, महिला मतदार 23 हजार 356 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 9 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून त्यांची संख्या 20 हजार 71 इतकी आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 81 मतदान केंद्रांवर 81 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक आयोगामार्फत मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.