- निखिल म्हात्रेअलिबाग - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक वाहन परवान्यासह अन्य परवान्यांसाठी अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. यानुसार आतापर्यंत ५९ अर्ज दाखल करण्यात होते. त्याचा तत्काळ निपटरा करण्यात आला.
नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि नोंदणीकृत पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात तसेच उमेदवार किंवा प्रतिनिधींनी लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षात अर्ज केले होते. त्यांची पडताळणी करून त्यांना परवानगी दिली आहे.
उमेदवार किंवा प्रतिनिधींनी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज केले होते. तसेच विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात तात्पुरते पक्ष कार्यालय उघडण्याबाबत, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, ध्वनिक्षेपण परवान्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलिस अधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते. या अर्जांची शहानिशा करून तत्काळ त्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक परवानगी लाऊडस्पीकर परवान्याची होती.
हेलिपॅडसाठी कुठे अर्ज करणार?जिल्ह्यात हेलिकॉप्टर उतरविण्याबाबत लागणाऱ्या परवान्यासाठी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखा यांच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातूनच हेलिपॅडसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी अधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांनी दिली.