Raigad: सीएसएमटी ते उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाची लगीनघाई, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 09:30 AM2023-07-03T09:30:24+5:302023-07-03T09:30:49+5:30
Raigad: मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या मार्गावरुन पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- मधुकर ठाकूर
उरण - नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतूकीचा मुहूर्त काढण्यात रेल्वे प्रशासन मश्गूल झाले आहे.सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरून प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे धावणार आहे. मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या मार्गावरुन पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. १५ जुलैपर्यंत दहा दिवसात कधीही प्रवासी वाहतूकीचा मुहूर्त साधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा लागुन राहीली आहे.१७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीपासूनच या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते.मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे.त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पुर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या.फेब्रुवारी ,मार्च,मे २०२३ महिन्याच्या अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून अनेक वेळा या मार्गावर ट्रायल रनही घेण्यात आली आहे.
मात्र या खारकोपर ते उरण या दरम्यानच्या मार्गावरील अनेक कामे अपूर्ण आहेत.आजच्या घडीपर्यत तरी जासई रेल्वे स्थानकाचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी विलंब होत आहे.ही वस्तुस्थिती आहे.मात्र वारंवार रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मुहूर्तावरही प्रवासी वाहतूक सुरू झाली नाही.यामुळे लोकप्रतिनिधींच या कामासाठी पाठपुरावा करण्यात कुठेतरी कमी पडत असावेत अथवा रेल्वे प्रशासन कामकाजात कमी पडत आहे अशा शंकाकुशंका नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.नागरिकांच्या शंकाकुशंकांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकप्रतिनिधींकडून नुकत्याच ओडीसातील बालासोर रेल्वे अपघातामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले असल्याची विविध कारणे पुढे केली जात आहेत.यामुळे मात्र परिसरातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरुळ-उरण रेल्वे हा मुद्दा परिसरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधींही नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतूकीच्या मुहूर्तासाठी आग्रही आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच या रेल्वे मार्गाचे उद्घाटन व्हावे यासाठी आग्रही आहेत.यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे धोशा लावला आहे.त्यामुळे मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या मार्गावरुन पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.
२० जुलैपासून पुढील २३ दिवस लोकसभेचे पावसाळी संसदीय अधिवेशन सुरू होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान विविध कार्यक्रमांसाठी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे.या मुंबई दौऱ्या दरम्यानच १५ जुलैपर्यंतच्या दहा दिवसातच सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरून प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे प्रवासी वाहतूकीचा मुहूर्त साधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.