- मधुकर ठाकूरउरण - उरण शहरातील रमझान खान यांच्या भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
उरण शहर असो की परिसर शेकडो अनधिकृत भंगाराच्या दुकानांनी बस्तान बसवले आहे. परिसरातील रस्तोरस्ती अशी अनधिकृत भंगाराची अनेक दुकाने उघडण्यात आली असल्याची जाता-येता दिसून येत आहेत.या भंगारांच्या दुकानात भंगार खरेदी करून आणलेला माल आहे की चोरीचा याबाबत पोलीस, प्रशासनाला कोणतीही माहिती नसते. मालाचाही कोणताही तपशील प्रशासनाकडे नसतो.
प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने उरण परिसरातील शेकडो भंगारांच्या अनधिकृत दुकानात ज्वालाग्राही रासायनिक पदार्थाचे ड्रम,पॅलेट, लाकडी सामान, पुठ्ठे , रबर आदी वस्तू मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आलेल्या असतात.यावर पोलिस किंवा प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने सुरू असलेली अवैध भंगाराची दुकाने बिनदिक्कतपणे सुरू आहेत. मात्र शुक्रवारी (२८) उरण शहरातील मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली.दहा बंबाच्या साहाय्याने भीषण आग विझविण्यात आली असली तरी ३६ तासानंतरही अद्याप धुमसत आहे.
या अनधिकृत भंगाराच्या गोदामात ज्वालाग्राही रासायनिक पदार्थाचे ड्रम,पॅलेट, लाकडी सामान, पुठ्ठे , रबर आदी वस्तू जळून खाक झाले.या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला कोणत्याही प्रकारची तसेच कोणत्याही शासकीय विभागांची परवानगीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.मग मागील १५-२० वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या उरण शहरातील भंगारांच्या अनधिकृत गोदामे, दुकानांना वरदहस्त कुणाचा, कुणाच्या आशीर्वादाने ही अनधिकृत भंगाराची दुकाने राजरोसपणे सुरू आहेत.
यांची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर तुर्तास उरण नगरपरिषदेला जाग आली आहे.उरण शहरातील एका अनधिकृत भंगाराच्या गोदामाला भीषण लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जाग आलेल्या उरण नगरपरिषदेने शहरातील २६ अनधिकृत भंगाराच्या गोदामांना नोटीसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे.सोमवारी नोटीसा बजावण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिली.त्यामुळे भंगाराची दुकाने स्थानिक पोलिस, प्रशासन, विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या वरदहस्तांनेच सुरू असल्याच्या निष्कर्षापर्यंत नागरिक येऊन ठेपले आहेत.तसे आरोप नागरिकांकडून आता उघडपणे केले जात आहेत.
उरण परिसरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेकडो अनधिकृत भंगारांच्या दुकानांवर कारवाई करण्याबाबत उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी असमर्थता व्यक्त केली आहे.भंगारांच्या दुकानांचा विषय हद्दीत असलेल्या त्या त्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील आहे.कारवाईचाही अधिकार ग्रामपंचायतींना आहे. पोलिस फक्त भंगारांच्या दुकानात काम करणाऱ्या संशयित कामगारांची कागदपत्रांची तपासणी करीत असतात. असेही वपोनि सतीश निकम यांनी सांगितले.शहरात शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीप्रकरणी कोणत्याही शासकीय विभागाच्या तक्रारींनंतरच गुन्हा दाखल केला जाईल असे सांगतानाच धोकादायक असलेल्या उच्च दाबाच्या वीजेच्या केबल्स खालीच हे भंगाराचे गोदामाचे बस्तान होते.याप्रकरणी पंचनामे, चौकशी केली जात असल्याचे वपोनि सतीश निकम यांनी सांगितले.
मात्र भंगाराच्या गोदामाच्या भीषण आगीनंतर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. राजकीय पक्षांचे पुढारी, पोलिस, प्रशासनाच्या वरदहस्तांमुळेच उरण परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावतोय आहे.यामुळे मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.