- मधुकर ठाकूरउरण - शिवडी- न्हावा सेतूच्या (अटल सेतू ) उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मागील आठ दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट अद्यापही सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले नाहीत.
त्यामुळे क्रशर-दगडखाण मालकच नव्हे तर बांधकाम व्यावसायिक बंदमुळे आर्थिक गर्तेत सापडले आहेत. शासकीय अनास्थेमुळे मात्र व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असुन याबाबत निश्चित तोडगा काढण्यासाठी सोमवारी (१५) व्यावसायिकांनी तातडीने बैठक बोलविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अटल सेतूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने उरण-पनवेल-बेलापुर दरम्यान रस्ते, राष्ट्रीय महामार्गावरील जासई, गव्हाण, बंबावीपाडा, कुंडेवहाळ,ओवळे ग्रामपंचायत, सिडकोच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट ६ ते १३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत.विद्युत पुरवठाही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.यामुळे मागील आठ दिवसांपासून शेकडोंच्या संख्येने क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बंद करण्यात आलेले क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट सुरू करण्याचे आदेश देतील या प्रतिक्षेत मालक-चालक आणि बांधकाम व्यावसायिक आहेत.मात्र शनिवार, रविवार दोन्ही शासकीय सुट्यांचे कारण पुढे करीत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश उठविण्यात स्वारस्य दाखविले नाही.यामुळे मागील नऊ दिवसांपासून शेकडोंच्या संख्येने क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद ठेवण्यात आलेले अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.या दिरंगाई बाबत निर्णय घेण्यासाठी संतप्त झालेल्या क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट मालक-चालकांची सोमवारी (१५) तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे.या महत्वाच्या बैठकीत चर्चा करून पुढील रुपरेषा ठरवली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.