जिल्ह्यातील १५० व्यक्तींना ‘रायगड भूषण’ पुरस्कार; सोहळा ठरला चर्चेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:26 PM2019-09-10T23:26:52+5:302019-09-10T23:27:13+5:30
सत्ताधारी कार्यक्रम उरकण्याच्या तयारीत
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा ‘रायगड भूषण’ पुरस्कार सोहळा चर्चेचा विषय झाला आहे. दरवर्षी हा पुरस्कार देण्याच्या संख्येत अफलातून वाढ होत आली आहे. या वर्षी जिल्ह्यातील तब्बल १५० व्यक्तींना ‘रायगड भूषण’ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्याची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांनी हा कार्यक्रम उरकण्याची तयारी केल्याचे दिसून येते.
तर दुसरीकडे पुरस्कारांच्या संख्येवरुन सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात असल्याने हा पुरस्कार सोहळा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. बुधवारी ११ सप्टेंबर २०१९ रोजी पीएनपी नाट्यगृहात या पुरस्कारांचे वितरण खासदार सुनील तटकरे आणि आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. रायगड भूषण पुरस्काराची सुरुवात खासदार सुनील तटकरे हे १९९३ साली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी रायगड मित्र या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पांडुरंग शास्त्री आठवले अशा दिग्गजांचा समावेश होता. त्यानंतर शेकापच्या राजवटीत या पुरस्काराचे नाव बदलण्यात येऊन रायगड भूषण असे करण्यात आले होते. त्यानंतर याच नावाने आतापर्यंत पुरस्काराचे वितरण केले जात आहे.
सामाजिक, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºयांना रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते. या आधी निवडक विभूतींनाच पुरस्काराने सन्मानित केले जायचे. पुढे त्यामध्ये राजकारण आल्याने पुरस्कारांची संख्या वाढत गेल्याचे बोलले जाते.गेल्याच वर्षी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ््याने उल्लेखनीय कार्य करणाºया शेकडो व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी दोन वर्षाचे एकदाच पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सोशल मीडियावर सुरु असलेल्या नाराजी नाट्याला सत्ताधाºयांनी भीक न घालता त्यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे.
सोशल मीडियावर नाराजी
या वर्षी तब्बल १५० व्यक्तींना या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण करण्याची परंपरा सुरु केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर आळवला जात आहे. सोशल मीडियावर रायगड भूषण पुरस्काराबाबत कडव्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीचे द्वंव पहायला मिळत आहे. पुरस्कार देताना पुरस्कारांचे महत्त्व कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी सामान्य अपेक्षा व्यक्त केली जात आहे.