- राजेश भोस्तेकर
अलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघाच्या जागेवर पुन्हा एकदा भाजपने रणशिंग फुंकले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुन्हा रायगडची जागा ही भाजपला मिळावी असा सूर लावला आहे. सिटीग खासदार सुनील तटकरे असले तरी त्यांना मदत करणारे त्यावेळेच्या किती आमदार त्याच्या सोबत आहेत असा सवाल जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उपस्थित करून भाजपची ताकद तुमच्या पेक्षा अधिक असेल तर भाजपने उमेदवारी का मागू नये असा सवाल धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची असलेली इच्छा ही वरिष्टाकडे मांडणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे रायगडच्या लोकसभा जागेवरून पुन्हा सत्ताधारी पक्षातच कलगी तुरा सुरू झाला आहे.
रायगड ३२ लोकसभा मतदार संघातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील बूथ कार्यकर्ता मेळावा सोमवारी ८ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथील जयमाला गार्डन येथे संपन्न झाला. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष दिलीप भोईर, सरचिटणीस ऍड महेश मोहिते, तालुकाध्यक्ष उदय काठे, कोषाध्यक्ष हेमंत दांडेकर, शहर अध्यक्ष ऍड अंकित बंगेरा यासह पदाधिकारी, बूथ सदस्य मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. रायगड लोकसभा मतदार संघ लढविण्यासाठी भाजपच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकाचा सिलसिला सुरू झाला आहे. अलिबाग येथे सोमवारी पार पडलेल्या बूथ मेळाव्यात रायगड लोकसभा जागेवर दावा भाजप कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत एक सूर बैठकीत उमटला होता. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यादृष्टीने कामाला लागा अशा सूचना केल्या. साडे नऊ वर्ष मोदीच्या हातात देश सुरक्षित आहे. दुसऱ्याच्या हातात तो जाऊ देता कामा नाही. चुकीचा उमेदवार द्यायचा नाही. अशा सूचना देत रायगड लोकसभामध्ये कोण हवे असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विचारला. त्यावेळी धैर्यशील पाटील असा एकच सुर उमटला. आपल्या भावना ह्या वरिष्ठकडे पोचवतो असे आश्वासन ना. चव्हाण यांनी दिले आहे. आजी माजी खासदारांनी काय केले? प्रत्येक घटकाला पुढे नेण्याचे काम मोदी करीत आहेत. केंद्राने सर्व घटकासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. मात्र या योजना आजी माजी खासदार यांनी पाच ते दहा वर्षात जनतेपर्यंत दिल्या का तर उत्तर नकारात्मक आहे. असा टोला सुनील तटकरे याना धैर्यशील पाटील यांनी मारला आहे. केंद्राच्या योजना पोहचविण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी केंद्रात देणे गरजेचे आहे. भविष्यात विकासाचे केंद्र रायगडकडे वळत आहे. रायगडाची जागा भाजपला मिळावी ही मागणी करीत विद्यमान खासदार मित्र पक्षाचे असेल तरी ३२ लोकसभा मतदार संघात ताकद भाजपची आहे. असे मत जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दुसऱ्यांना पुढे नेण्यापेक्षा आपला माणूस पुढे न्या - आ. प्रशांत ठाकूरपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेसाठी झटत आहेत. लोकांची विकासकामे करून भाजप पुढे जात आहेत. मात्र निवडणुका आल्या की आपण दुसऱ्या पक्षाचा प्रचार करून त्यांना पुढे नेत आहोत आणि आपण मागे राहत आहोत. त्यामुळे यावेळी आपला माणूस पुढे जाणे अपेक्षित आहे. असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेळाव्यातून व्यक्त केले आहे.
भाजपचा उमेदवार दिल्लीत गेला पाहिजे शिवसेनेची भावना - महेश मोहिते
रायगडचे खासदार सुनील तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नको अशी भावना शिवसेना आमदारांची ही आहे. जनतेमधून निवडून आलेल्या शिवसेना आमदाराची भूमिकाही भाजपचा उमेदवार खासदार व्हावा सुनील तटकरे नको अशी आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रायगडची जागा ही भाजपलाच मिळावी अशी भूमिका भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड महेश मोहिते यांनी मांडली आहे.