- मधुकर ठाकूर उरण : पेण ते पनवेल दरम्यान नाट्यमय, फिल्मी पद्धतीने केलेल्या कारवाईत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (३) मोठ्या प्रमाणात कॅपिझ शंख (शेल्स) जप्त केले आहेत. त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यांवधींच्या घरात आहे.या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे महाड परिसरातुनही शेलच्या पावडरने भरलेली आणखी दोन वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत असताना रायगड विभागीय वनअधिकारी आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय वाघमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे (उरण), कुलदीप पाटकर (पेण) आणि ज्ञानेश्वर सोनवणे (पनवेल) यांच्या नेतृत्वाखाली वन अधिकाऱ्यांनी संशयित दोन हलक्या व्यावसायिक वाहनांचा पाठलाग केला. तासाभराच्या पाठलागानंतर वाहनांना रोखण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले.त्यानंतर केलेल्या तपासणीत दोन्ही वाहनांमध्ये शंखांनी (शेल्सने) भरलेल्या गोण्या आढळून आल्या.हे शंख, शिंपले वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची lV अनुसार संरक्षित आहेत.आखाती (गल्फ) देशांमध्ये तेल उत्खननात ड्रिल पाईप्समध्ये सिमेंट भरण्यासाठी शंखांच्या (शेल) पावडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे रॅकेट दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असल्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.या कारवाईच्या तपासाचा धागा हाती येताच मिळालेल्या माहितीच्या आधारे महाड परिसरातुनही शेलच्या पावडरने भरलेली आणखी दोन वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.शंख जप्त केले आहेत आणि आता त्यांचा उगम आणि उपयोगाची आणखी कसून चौकशी केली जात आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणखी काही ठिकाणी शंख, शिंपल्यांचा साठा लपवून ठेवला असल्याचा संशय आहे.त्या दिशेने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.सोमवारी सकाळीच शंख जप्त केले आहेत.आता त्यांचा उगम आणि उपयोगाची कसून चौकशी केली जात आहे. तिथे अनेक गोण्या होत्या आणि त्यांची मोजणी अजून केली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
झूमर, टेबलटॉप्स, कोलॅप्सिबल स्क्रीन, फर्निचर, लॅम्पशेड्स, कटलरी आणि शोभेच्या दाग-दागिन्यांच्या सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी या शंखांचा (शेल्सचा) वापर केला जातो.तसेच या भागात कॅपिझचे शंख (शेल) पकडण्याची ही पहिलीच वेळ वेळ नसुन जून २०१७ मध्ये उलवे येथे वनाधिकाऱ्यांनी तब्बल ८० टन शंख जप्त केले होते.अशी माहिती पर्यावरणवादी व नाटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली.