लोकमत न्यूज नेटवर्क , महाड : सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा अलोट उत्साही वातावरणात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर गुरुवारी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून नंतर प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. शिवराज्याभिषेक वर्धापन दिन हा शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने साजरा करण्यात येतो. यावर्षी सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगडवरील मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. गडावर गेले दोन दिवस विविध धार्मिक विधी, पूजापाठ असे मंगलमय वातावरण होते. गडावरील विविध देवी-देवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र हे शिवाजी महाराजांच्या विचारांनी वाटचाल करणारे राज्य : मुख्यमंत्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केले. शिवरायांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणून आताही सुराज्य निर्माण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य हे शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराजांचे कर्तृत्व आणि त्याग मोठा आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन कितीही दिवस साजरा केला तरी तो कमी आहे, असेही ते म्हणालेे.
सुवर्ण नाण्यांचा अभिषेक किल्ले रायगडावर मंगलमय वातावरणात सकाळी ६ वाजता शिवराज्याभिषेकाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. मंत्रघोषात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्ठित करण्यात आली. सिंहासनावर आरूढ झालेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. हा क्षण उपस्थित शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेणारा होता.
व्हीआयपींसाठी शिवप्रेमींचे हालसोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. मात्र, या सोहळ्यासाठी अनेक ‘व्हीआयपी’ मंडळी उपस्थित होती. त्यामुळे रायगड रोपवे काही काळ सामान्य शिवप्रेमींसाठी बंद ठेवला होता. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव तीन किलोमीटर अंतरावरच वाहने थांबवण्यात आली होती.