रायगड : माेदी सरकारने पारीत केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या आंदाेलनाच्या वज्र मुठीला बळ मिळावे, यासाठी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली. त्याला जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी माेठ्या संख्येने पाठींबा दिला, तर जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात काेठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे.रायगड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद हाेत्या. बाजारपेठांमधील सकाळी लवकर उघडणारी दुकाने अकरा वाजले, तरी उघडली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर, व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने जनजीवन पूर्वदावर आले. अलिबाग, म्हसळा, पेण, खालापूर, कर्जत, श्रीवर्धन, रसायनी, यासह अन्य तालुक्यांमध्ये बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. सरकारी कर्मचारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व कामगार, कर्मचारी माेठ्या संख्येने खांद्याला खांदा लावून उभा आहे. सरकारने तातडीने केलेले कृषी कायदे रद्द करावेत अन्यथा आरपारची लढाई करावी लागेल अशा इशारा त्यांनी माेदी सरकाराला निवेदनाच्या माध्यमातून दिला. ठिकठिकाणी तहसीलदार यांना सरकारी कर्मचारी संघटनेने निवेदन दिले.उरणमध्ये महाआघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांची निषेध रॅली काढली होती. या वेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या रॅलीत शिवसेनेचे माजी आ. मनोहर भोईर अन्य पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हसळा : शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ला म्हसळा तालुक्यातील सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के बंदला पाठिंबा दिला. तसे पत्र परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांना देण्यात आले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत महसूल विभागाचे टेंभे, वनविभागाचे राकृष्ण कोसबे, वनपाल थळे, वनरक्षक भीमराव सूर्यतळ, वनरक्षक अतुल अहिरे, महसूलच्या साखरे, बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रसायनीत ‘भारत बंद’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मोहोपाडा/ रसायनी : शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचे कृषीविषयक धोरणास विरोध करण्यासाठी रसायनीत १०० टक्के बंद ठेवण्यात आला. यावेळी रसायनी ते दांडफाटा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दुकाने बंद ठेवली होती. ‘‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. याला साथ देत रसायनीकरांनी रसायनी बंद ठेवून ''भारत बंद'' यशस्वी करून दाखविला. रसायनीकर शेतकऱ्यांचा पाठीशी आहेत, हे यातून स्पष्ट झाले आहे. रसायनीतील वावेघर, मोहोपाडा व रिस बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसादमहाड : केंद्र सरकारने लादलेले शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारलेल्या ‘भारत बंद’ला महाडमध्ये संमिश्र प्रतिसाद लाभला. महाआघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेनेकडून शहरात स्वतंत्रपणे निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौकात शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यासह शहर प्रमुख नितीन पावले, सेना पदाधिकारी यांनी शिवाजी चौकात मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही शहरातून रॅली काढत मोदी सरकारचा निषेध केला. या रॅलीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, शहराध्यक्ष सुदेश कलमकर, धनंजय देशमुख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘भारत बंद’ला पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसादपनवेल : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले होते. पनवेल शहरातील शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘मजदूर किसान एकता जिंदाबाद जिंदाबाद’, ‘बघता काय? सामील व्हा!’, ‘किसानविरोधी बिल मागे घ्या - मागे घ्या’, ‘अमित शहा हाय हाय’ आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, सुदाम पाटील, शिरीष घरत, आर. सी. घरत आदींसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या वेळी पूर्णपणे बंद होती. शहरातील मुख्य बाजारपेठ काही काळ बंद ठेवण्यात होती. काही दुकाने, मॉल्स या वेळी बंद ठेवण्यात आले होते. पनवेलसह खारघर, कामोठे, नवीन पनवेल, तळोजे या ठिकाणी दुकाने काही वेळ बंद ठेवण्यात आली होती.