पोलादपूर/ दिघी : गुरुवारपासून पावसाने जाेर पकडला असून शुक्रवारी दिवसभर संततधार सुरूच होती. यामुळे रायगड जिल्ह्यात दोन ठिकाणी रस्त्यावर दरड पडल्याच्या घटना घडल्या. पोलादपूर- महाबळेश्वर राज्य मार्गावर कुंभळवणे गावाजवळ मातीचा ओसरा खाली आला तर तर श्रीवर्धन तालुक्यात वडवली- दिघी मार्गावर कुडगाव पाण्याच्या टाकीजवळ दरड रस्त्यावर आली. प्रशासनाने तत्काळ दखल घेत दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे.
पोलादपूर तालुक्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून, वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या २४ तासांत ४१ मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार सुरू आहे. पोलादपूर- महाबळेश्वर राज्यमार्गावर कुंभळवणे गावाच्या जवळ मातीचा ओसरा खाली आल्याची घटना घडली. पायटा गावाच्या आसपास एक झाड वाकल्याने रस्त्याच्या बाजूला झुकले. दरड खाली आल्याने, काही तास वाहतूक खोळंबली होती.
दरड केली बाजूला सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जेसीबीने माती बाजूला करण्याचे काम सुरू केले. दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दिघी- पुणे महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे वडवली- दिघी मार्गावर कुडगाव पाण्याच्या टाकीजवळ दुपारी अचानक दरड कोसळली. मुसळधार पाऊस व त्यात पोखरलेले डोंगर त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यासह मोठा दगड रस्त्यावर आला. त्यावेळी येथून कोणतेच वाहन जात नसल्याने अनुचित प्रकार टळला.