अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मायणी या गावातील संजय पवार व त्यांच्या भावाच्या कुटुंबांना वाळीत टाकल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.संजय पवार व आरोपी हे एकाच गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यात २०१४पासून जमिनीचा वाद झाला होता. त्यावरून संजय पवार यांच्या भावास २०१४पासून आरोपींनी वाळीत टाकले होते. पवार यांच्या भावास वाळीत टाकलेले असूनसुद्धा, तो त्याच्याशी बोलतो, या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून संजय पवार यांनाही वाळीत टाक ले. दोघांच्याही कुटुंबांना वाळीत टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर तपास करीत आहेत.गेल्या पाच वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यात वाळीत टाकण्याची (सामाजिक बहिष्काराची) अनेक प्रकरणे घडली होती. त्या प्रकरणी सुमारे १०० गुन्हेदेखील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाले आहेत. मानवी हक्क क्षेत्रात कार्यरत अॅड. असीम सरोदे यांनी या कायद्याचे तयार केलेले प्रारूप मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून याबाबतचा सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा राज्य सरकारने संमत केला आणि तो ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा २०१६’ या नावाने अमलात आला आहे. तरीही समाजातून वाळीत टाकण्याची ही कुप्रथा कायम असल्याचे दिसून येत आहे.
वाळीत टाकल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:25 AM