- निखिल म्हात्रेअलिबाग - साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी एकमार्ग ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील उद्भवत आहे.
अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती असलेला व मुरूड तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आल्याने साळाव पुलावरून वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ दिसून येते. मागील दोन वर्षांपासून साळाव पुलाच्या दुरूस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गतवर्षी काही काम पूर्ण झाले होते. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पुलाच्या दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून पूल दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु, ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्यचा आरोप स्थानिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कामात अडथळा नको म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलावरून अवजड वाहतुकीस पूर्णपणे बंदी असून, छोट्या वाहनांसाठी एक मार्ग ठेवण्यात आला आहे.
ऐन एप्रिल, मे महिन्यातील सुट्टीचे दिवस व मुरूड तालुक्यातील पर्यटनाचे आकर्षण यामुळे साळाव पुलावरून वाहतुकीत वाढ झाली आहे. परंतु, पूल दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीस अडथळे येत असून, अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शिवाय, पुलावरील रस्ता खोदण्यात आल्याने रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता आहे. याबाबत शिवसेनेचे मुरूड उपतालुकाप्रमुख भगीरथ पाटील यांनी सार्वजजिक बांधकाम विभागास दुरुस्ती कामाच्या विलंबाबाबत विचारणा केली. मात्र, तरीही काम संथगतीने सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.